कांदा-बटाटा दर स्थिर : रताळी दरात 400 रुपयांची घसरण
जवारी बटाटा दरात 100 रुपयांची घट : लसूण दर टिकून : आवक कमी असल्याने भाजीपाल्यांच्या दरात किंचित वाढ
वार्ताहर/अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र कांदा, कर्नाटक कांदा आणि पांढरा कांद्याचा भाव प्रतिक्विंटल स्थिर झाला. तसेच इंदोर बटाटा, आग्रा बटाटा यांचा भावदेखील स्थिर झाला. बेळगाव जवारी बटाटा भाव मात्र क्विंटलला शंभर रुपयांनी कमी झाला. रताळी दरात क्विंटलला चारशे रुपयांची घसरण झाली आहे. लसूण दरात स्थिरता टिकून आहे. भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या आवकेत थोड्या प्रमाणात घट निर्माण होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. बेळगाव एपीएमसीमध्ये शनिवार दि. 10 रोजी महाराष्ट्रातून सुमारे 80 ट्रक कांदा आला होता.
तर कर्नाटकातून सुमारे 30 ट्रक कांदा आला होता. पांढऱ्या कांदा केवळ एक ट्रक विक्रीसाठी आला होता. परराज्यातील इंदोर बटाटा आवक सुमारे दहा ट्रक व आग्रा बटाट्याचे सहा ट्रक विक्रीसाठी दाखल झाले होते. महाराष्ट्र कांद्याचा दर 1000 पासून 2000 रुपयापर्यंत झाला आहे. कर्नाटक कांद्याचा दर 800 रुपयेपासून पंधराशे रुपयेपर्यंत झाला आहे. पांढरा कांदा दर 800 पासून पंधराशे रुपयेपर्यंत क्विंटल दर झाला आहे. इंदोर बटाटा भाव 2300 पासून 2500 व आग्रा बटाटा भाव 1800 पासून दोन हजार रुपयेपर्यंत झाला आहे.
जवारी लसूण दर 7000 पासून 9000 पर्यंत, हायब्रीड पुडी लसूण दर 4000 ते 6000, हायब्रीड मिडीयम लसूण दर सहा हजार पासून दहा हजार, लाडवा लसूण भाव 12000 पासून 13000, हायब्रीड बॉम्ब लसूण दर 14 हजार ते 15000 रुपये झाला आहे, अशी वरील संपूर्ण माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील जवारी बटाटा आवक सुमारे 1500 पोती आणि रताळी सुमारे 1200 पिशव्या आवक झाली होती. जवारी बटाटा दर क्विंटलला 200 पासून ते दोन हजार रुपयेपर्यंत झाला व रताळी दर 500 पासून एक हजार रुपयेपर्यंत झाला आहे, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
रताळी दरात चारशे रुपयांची घसरण
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे देशभरात तापमान वाढले आहे. विशेष करून रताळी हे खाद्य थंडीच्या दिवसांमध्ये व पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी म्हणून वापर केला जातो. उकडून व भाजून आणि चिप्स व बेस्ट करून देखील याचा परराज्यामध्ये खाण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र सध्या गरमीचे दिवस असल्याकारणाने परराज्यातून मागणी बंद झाली आहे. यामुळे केवळ बेळगाव परिसरापुरतेच याची मागणी असते. रताळ्यासाठी परराज्यातील खरेदीदार आल्यावरच भाव वाढतो. मात्र सध्या तशी परिस्थिती नसल्याने रताळी दरात चारशे रुपयांची घसरण झाली आहे. तसेच शनिवारी रताळ्याची दोन ट्रक दिल्लीला लोडिंग करण्यात आली आहे, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली आहे.
जवारी बटाटा दरात शंभर रुपयांनी कमी
रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेली जवारी बटाटा उत्पादन गेल्या दोन महिन्यापासून मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. विशेष करून तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बटाटा उत्पादन मोठ्याप्रमाणात घेण्यात येतो. याला पाण्याची जास्त आवश्यकता असते. लाल आणि पांढरा बटाटा मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. यापूर्वी पांढऱ्या बटाट्यापेक्षा लाल जमिनीतील बटाट्यालाच मोठ्या प्रमाणात मागणी असे. परंतु आता लाल आणि पांढरा बटाटा दर एकच आहे. शनिवारी एपीएमसीतील कांदा मार्केटमध्ये परराज्यातील आग्रा आणि इंदोर बटाटा आवक वाढल्याने जवारी बटाटा दरात शंभर रुपयांची घसरण झाली आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्याने दिली.
महाराष्ट्रातून टोमॅटो आवकेत वाढ, दरात अस्थिरता
सध्या महाराष्ट्रातून टोमॅटोची आयात मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे बेळगाव तालुक्यातील टोमॅटो व महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारात येत आहेत. त्यामुळे सध्या भाजीमार्केटमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात दररोज होत असल्याकारणाने टोमॅटोचा ट्रेचा दर टिकून आहे. जर महाराष्ट्रातून टोमॅटो आवक कमी झाली तर बेळगाव भाजीमार्केटमध्ये टोमॅटो ट्रेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो येत असल्याकारणाने टोमॅटोचा दर टिकून आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्याने दिली.
भाजीपाला दरात किंचित प्रमाणात वाढ
सध्या उन्हाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे विहिरी, नदी-नाले, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनासाठी पाणी अपुरे पडत असल्याकारणाने भाजीपाला उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे भाजीमार्केटमध्ये देखील थोड्या प्रमाणात आवकेत घट निर्माण झाली आहे. यामुळे भाजीपाल्यांच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.