कांदा, बटाटा, गूळ भाव स्थिर : रताळी दरात किंचित घट
भाजीपाला आवकेत दिवसेंदिवस घट होत असल्यामुळे दरात किंचित वाढ : कोथिंबीर आवकही घटली
सुधीर गडकर/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, बटाटा, गूळ यांचा भाव प्रतिक्विंटल स्थिर आहे. तर रताळ्यांचा भाव क्विंटलला 100 रुपयांनी कमी झाला. तसेच गुळाचा भावदेखील 100 रुपयांनी कमी झाला आहे. सध्या भाजीमार्केटमध्ये भाजीपाला आवकेत दिवसेंदिवस घट निर्माण होत आहे. या कारणामुळे पालेभाज्यांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या आवकेतसुद्धा घट निर्माण झाल्याने कोथिंबीरचा भाव शेकडा 15 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत होत आहे. टोमॅटोच्या आवकेत वाढ झाल्याने दर थोड्या प्रमाणात घटला असून प्रति ट्रेचा भाव 200-400 रुपयांपर्यंत होत आहे.
बुधवार दि. 21 रोजी कांदा आवकेत घट निर्माण्ण झाल्याने कांद्याचा दर भडकला आणि क्विंटलला 3000-4500 रुपये भाव झाला होता. यापूर्वी भाव 3000-4000 रुपयांपर्यंत होता. अचानक भाव वाढल्याने याचा व्यापारावर परिणाम झाला. तर व्यापारी, शेतकरी आणि खरेदीदार शनिवारच्या बाजारात काय भाव होणार याकडे लक्ष लागून होते. मात्र शनिवार दि. 24 रोजी देखील बुधवारचाच भाव टिकून राहिला. यामुळे कांदा दर स्थिर झाला आहे. यावेळी मार्केट यार्डमध्ये सर्रास भाव 3500-4600 रुपये झाला. तर काही दुकानांमध्ये चुकून क्विंटलला 4800 रुपयांप्रमाणे कांदा सवाल झाला. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कांदा पुन्हा भडकणार असल्याची चर्चा व्यापाऱ्यांतून होत आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
परराज्यामध्ये कांदा निर्यातीमुळे दरवाढ
मागीलवर्षी कांदा दरात वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातून निर्यात होणारा कांदा पूर्णपणे बंद केला असून मार्च 2024 पर्यंत निर्यातीवर संपूर्णपणे बंदी घातली होती. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होताच केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यामुळे भारतातून कांदा विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात जात आहे. यामुळे देशामधील बाजारपेठेमध्ये कांदा आवकेत घट निर्माण झाल्याने दरात वाढ झाली आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
भाजीपाला आवकेत घट
बेळगाव जिल्ह्यामध्ये शेतकरी भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. मात्र यंदा पावसाने हाहाकार घातल्याने सर्वत्र पाणीच पाणी होऊन भाजीपाला शेतामध्ये पाणी तुंबून राहिल्याने मोठ्या प्रमाणात खराब झाला. यामुळे उत्पादनात घट निर्माण झाल्यामुळे भाजीमार्केटमध्ये भाव वाढत आहेत. मेथी, शेपू, पुदीना, मुळा, कोथिंबीर यांच्या दरात वाढ झाली आहे. तर टोमॅटोच्या आवकेत थोड्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे टोमॅटोचा भाव अल्प प्रमाणात घटला आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.
200 पिशव्या जवारी बटाटा दाखल
बेळगाव तालुक्यातील जवारी बटाटा बुधवार दि. 21 पासून मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी येण्यास प्रारंभ झाला आहे. यावेळी 16 पिशव्या आवक झाली होती. आणि शनिवार दि. 24 रोजी सुमारे 200 पिशव्या जवारी बटाटा विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये दाखल झाला होता. दरवर्षी गणेश चतुर्थीनंतर बेळगाव बटाटा विक्रीसाठी येतो. मात्र यंदा गणेश चतुर्थीपूर्वीच जवारी बटाटा विक्रीसाठी दाखल झाला आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील मसार जमिनीतील बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून तोच बटाटा त्वरित मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणला जात आहे. लाल जमिनीमधील बटाटा उघडीप पडल्यानंतर काढण्यात येतो आणि काळ्या जमिनीतील बटाटा उत्पादन उन पडल्यानंतर आणि जमीन सुकल्यानंतर काढण्यात येतो. सध्या बेळगाव जवारी बटाटा उत्पादन विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये येण्यास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
रताळी दरात किंचित घट
एक महिन्यानंतर आता एक आठवड्यापासून रताळी आवक विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी पुन: प्रारंभ झाला आहे. यापूर्वी रताळी दर क्विंटलला 3000-4000 रुपये होता. मात्र आता एक आठवड्यापासून भाव 3000-3500 रुपये झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील आवक काढणीला प्रारंभ झाला आहे. नवीन रताळी आवक गणेश चतुर्थीनंतर प्रारंभ होणार आहे, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली आहे