कांदा, बटाटा लसूण दर स्थिर
जवारी बटाट्याची आवक धिम्या गतीने : पावसाचा परिणाम : पाऊस सुरू राहिल्यास पीक खराब होण्याची शक्यता
सुधीर गडकरी अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक कांदा. इंदोर, आग्रा, हासन, जवारी बटाटा रताळी आणि लसूण यांचा क्विंटलचा भाव स्थिर आहे. मात्र पांढऱ्या कांद्याची एक पिशवी देखील आवक आली नाही.
शनिवार दि. 27 रोजी बेळगाव एपीएमसी मार्केट यार्डमध्ये महाराष्ट्र कांद्याच्या सुमारे 50 ट्रक, कर्नाटकातील जुना कांद्याच्या 10, नवीन कर्नाटक कांद्याच्या सुमारे 20 ट्रक, इंदोर बटाट्याच्या 6 ट्रक, आग्रा बटाट्याच्या 3 ट्रक आणि हासन बटाट्याच्या 5 ट्रका विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. महाराष्ट्र कांद्याचा दर क्विंटलला 1000 पासून 2000 रुपयापर्यंत झाला. नवीन कर्नाटक कांद्याचा दर 200 पासून 1200 पर्यंत, जुना कांदा दर 800 पासून 1600 पर्यंत, इंदूर बटाटा भाव 1800 पासून 2100 पर्यंत, आग्रा बटाटा 1200 पासून 1600 रुपये असून, बटाटा दर 500 पासून 2100 पर्यंत झाला आहे. पांढऱ्या कांद्याची एक पिशवी देखील आवक झाली नाही अशी माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.
गेल्या दोन महिन्यापासून कांदा, बटाटा दर टिकून आहेत. सध्या महाराष्ट्रामधून कांदा येत आहे. बटाटा इंदोर, आग्रा, हासन म्येधून येत आहे. बेळगाव तालुक्यातील जवारी बटाटा गेल्या पंधरा दिवसापासून सावकाश येत आहे. या बटाट्याला बेळगाव परिसरासह राज्यात देखील हळूहळू मागणी होत आहे.
पावसामुळे बटाटा, रताळी काढणी रेंगाळली
गणेश चतुर्थीनंतर तालुक्यामध्ये पावसाळी हंगामात लागवड केलेली जवारी, बटाटा, रताळी काढणीला वेग येतो. मात्र, यंदा पाऊस सतत पडत असल्याने जमिनी अद्याप ओल्याच आहेत. त्यामुळे बटाटा, रताळी काढणे कामे रेंगाळले आहे. मसार व लाल जमिनीतील बटाटा व रताळी काढणीला हळूहळू सुरुवात झाली होती. मात्र गुरुवार दि. 26 पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बटाटा, रताळी काढणी बंद झाली आहे.
बटाटा पीक वाया जाण्याची शक्यता
पावसाळ्यात लागवड केलेली बटाटा पिके सध्या काढणीला आली आहेत. मात्र, सध्याच्या पावसामुळे बटाटा पिकाच्या शेतामध्ये पाणी तुंबले आहे. यामुळे जमिनीमध्ये असलेला बटाटा कुजून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे
डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील नवीन कांदा येण्याची शक्यता
महाराष्ट्रामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे कांद्याचे काही पीक खराब झाले आहे. साहजिकच अवकेत घट निर्माण होण्याची शक्यता आहे. दहा हजार पोती रताळी व 2000 .पिशव्या जवारी बटाटा आवक झाली आहे.
पावसामुळे बटाटा, रताळी काढणी संत गतीने सुरू आहे. यामुळे मार्केट यार्डमध्ये रताळ्याच्या सुमारे दहा हजार पिशव्या आवक विक्रीसाठी आली होती. बटाट्याची सुमारे 2000 पिशव्यांची आवक झाली होती. पाऊस नसता तर बटाटा व रताळी आवकेत वाढ झाली असती. मार्केट यार्डमध्ये यंदा देखील परराज्यातील खरेदीदार रताळी व जवारी बटाटा खरेदीसाठी दाखल झाले आहेत. सध्या परराज्यातील हरियाणा, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी ठिकाणी निर्यात होत आहेत. वरील संपूर्ण माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
पावसामुळे व्यापारावर परिणाम
मुसळधार पावसामुळे एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांसह बेळगाव परिसरातील व्यापार थंडावला आहे. सर्वसामान्य नागरिक बाहेर येत नसल्याने बेळगाव शहरांमध्ये नेहमी गजबजलेले कांदा मार्केट, खडेबाजार, गणपत गल्ली, भेंडी बाजार, गांधीनगर, मारुती गल्ली, शहापूर, वडगाव, खासबाग, टिळकवाडी, पिरनवाडी आदी परिसरात कांदा, बटाटा व कच्चा भाजीपाला व्यापारावर परिणाम झाला आहे. खरेदीदारच नसल्याने व्यापाऱ्यांनीही देखील विक्रीसाठी दुकाने लावली नाहीत. सध्या उघडीप पडल्यावरच व्यापार वहिवाट सुरळीत होणार आहे अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली.
भाजीपाला दर स्थिर
एपीएमसी बाजी मार्केटमध्ये कच्च्या भाजीपाल्यांची आवक येत आहे. सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाला भाजी मार्केटमध्ये येत आहे. दररोज पहाटे चार वाजता मार्केटला सुरुवात होते. मात्र खरेदीदार पाच-सहा वाजता एपीएमसीला येतात. सध्या बाजार जोमात भरत आहे. व्यापार वहिवाट सुरळीतपणे चालू आहेत. कच्च्या भाजीपाल्यांचे दर टिकून आहेत. पावसामुळे भाजीपाला आवकेत थोड्या प्रमाणात घट झाली आहे. तरी देखील भाव टिकून आहेत अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली
