कांदा निर्यातीवरील बंदी उठवली! कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांना दिलासा
देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने डिसेंबरपासून घातली होती बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. सुऊवातीला 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाईल. देशातील कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 निश्चित करण्यात आली होती, परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच मागे घेण्यात आली आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रात कांद्याचा पुरेसा साठा पाहता सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना कांदा शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती दिली होती. देशातील कांदा उत्पादक भागात कांदा आणि इतर भाज्यांच्या किमतीत घसरण आणि कांद्याचा पुरेसा साठा यामुळे सरकारने निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कांद्याचे उत्पादन घटल्याने आणि गगनाला भिडलेले भाव यामुळे केंद्र सरकारने 8 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी 31 मार्च 2024 पर्यंत लागू करण्यात आली होती. गतवषी डिसेंबर महिन्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ होत भाव 100 ऊपये किलोवर पोहोचले होते. यानंतर सरकारने सक्रिय होत किमतींवर नियंत्रण ठेवले.
सरकारकडून रास्त भावात विक्री
कांदा निर्यातबंदीबरोबरच सरकारने लोकांना स्वस्त कांदा विकण्यासाठी पावले उचलली. सरकारने बफर स्टॉकमधून कांदा बाहेर काढत 25 ऊपये किलो दराने विकला होता. त्यानंतर बाजारपेठेतही कांद्याचे दर नियंत्रणात आले होते. निर्यातबंदीनंतर सर्वाधिक कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरल्यामुळे देशाच्या सर्व भागात मागणी आणि वापरानुसार कांद्याचा पुरवठा होऊ लागला. आता घाऊक बाजारात कांद्याची चांगली आवक झाल्याने कांद्याचे दर नरमले आहेत.