किरकोळ बाजारात कांदा-लसणाच्या दरात घट
लसूण 200, कांदा 30 रुपये किलो, गृहिणींना दिलासा
बेळगाव : मागील अनेक महिन्यांपासून तेजीत असलेले लसणाचे दर हळूहळू उतरले आहेत. तर काद्यांचे दरदेखील कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ बाजारात 400 रु. किलो मिळणारी लसूण 200 रुपयांवर आली आहे. तर 40 ते 50 रुपये मिळणारा कांदा 25 ते 30 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. मागील काही महिन्यांपासून कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले होते. विशेषत: लसूणचे दर 400 रुपये प्रतिकिलो झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून लसूण गायब झाली होती. मात्र आता चार दिवसांपासून लसणाच्या दरात हळूहळू घट होऊ लागली आहे. 400 रुपयांवरून लसूण आता 200 रुपयांपर्यंत खाली आली आहे. कडधान्य, डाळी, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक साहित्यांच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने गोरगरिबांना जगणे असह्या झाले आहे. त्यात आता तुरडाळ, कांदा आणि लसणाचे दर काहीसे कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. हळूहळू कांदा आणि लसणाची आवक वाढू लागल्याने पुन्हा दरात घट होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.