श्वानावर अॅसिड फेकल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा
गुन्हा अंतर्मनाला हादरवून टाकणारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने एका श्वानावर अॅसिड फेकल्याप्रकरणी एका इसमाला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अॅसिड हल्ल्यामुळे श्वानाला एका डोळ्याची दृष्टी गमवावी लागली होती. हा गुन्हा अंतर्मनाला हादरवून टाकणारा आणि अमानवीय आहे. अशाप्रकारच्या गुन्ह्यात कमी शिक्षा देऊन सोडणे किंवा नरमाई बाळगल्यास समाजात चुकीचा संदेश जाणार असल्याचे उद्गार न्यायाधीश ऋचा शर्मा यांनी काढले आहेत.
न्यायालयाने भादंविचे कलम 429 अंतर्गत 10 हजार रुपये तर पशू क्रूरता कायद्याच्या अंतर्गत 50 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षेचा कालावधी तीन महिन्यांनी वाढविला जाणार आहे. 14 मार्च 2024 रोजी आरोपी महेंद्र सिंहला दोषी ठरविण्यात आले होते. गुन्हेगाराचे वय 70 वर्षे आहे. तर श्वानावर अॅसिड फेकण्याची घटना 2020 साली घडली होती.