एक वर्षे वय, 23 देशांचा प्रवास
भटकंती कुणाला आवडत नाही, हिंडण्याफिरण्यामुळे माणूस जागरुक होत असतो, त्याला वेगवेगळ्या ठिकाणाचे लोक आणि त्यांच्या परंपरांविषयी कळत असते. याचमुळे प्राचीन काळापासून भटकंतीला मानवी आयुष्यात वेगळे स्थान मिळाले आहे. त्या काळात यात्रांद्वारे ज्ञान अर्जित केले जायचे. सोशल मीडियाच्या या काळात ट्रॅव्हलिंगचा छंद तर लोकांच्या जीवनाचा भागच ठरला आहे. शेकडो लोक ट्रॅव्हल व्लॉग तयार करताना दिसून येतात. परंतु हे लोक जितके फिरले नसतील त्याहून अधिक एक वर्षाची मुलगी फिरली आहे. या मुलीने केवळ एक वर्षे वय असताना 23 देशांचा प्रवास केला असून आता ती 24 व्या देशात पोहोचली आहे.
फ्रांसेस्का ड्रॅबलने अलिकडेच स्वत:चा पहिला वाढदिवस सायप्रसमध्ये साजरा केला आहे. फ्रांसेस्का ही इंग्लंडची रहिवासी आहे. तिने या एक वर्षात 23 देशांचा प्रवास पूर्ण केला आहे. या मुलीने स्वत:चे पहिले उड्डाण डॉमिनिकन रिपब्लिकसाठी केले होते. त्यावेळी ती केवळ 7 आठवड्यांची होती. त्यानंतर तिचा प्रवास सुरूच राहिला. तिने तुर्किये, क्रोएशिया, आयर्लंड, इटली, स्पेन, नेदरलँड्स इत्यादी देशांचा प्रवास केला आहे. तिचे सर्वात पहिले सॉलिड फूड ग्रीसमध्ये एक ऑक्टोपस डिश होती. मँचेस्टर येथे राहणारी तिची 33 वर्षीय आई लॉरेन ब्लेकने माझी मुलगी मी जे खाते ते सर्वकाही खात असल्याचे सांगितले आहे. माझ्या मुलीने जगभरातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चाखावेत अशी माझी इच्छा असल्याचे त्यांचे सांगण sआहे. लॉरेन एक अॅडव्हान्स्ड क्लिनिकल प्रॅक्टिशनर आहेत. त्या मॅटर्निटी लीव्हदरम्यान जगभ्रमंतीचा आनंद घेत आहेत.
लॉरेनचे पती बेंजामीन ड्रॅबल एक हीटिंग आणि प्लंबिंक इंजिनियर आहेत. कामामुळे त्यांना या भटकंतीकरता फारसा वेळ काढता आलेला नाही. या प्रवासाच्या आठवणी आयुष्यभर पुरणाऱ्या आहेत. हा वेळ मला पुन्हा मिळणार नाही. याचमुळे याचा मी पूर्ण लाभ घेऊ इच्छिते असे लॉरेन यांचे सांगणे आहे.