सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘एक खिडकी’
पोलीस आयुक्त कार्यालयात सर्व विभागांची परवानगी मिळणार एकाच छताखाली : एक खिडकी योजना आजपासून सुरू
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांना एकाच छताखाली उत्सवासाठी आवश्यक सर्व खात्यांची परवानगी मिळविण्यासाठी शुक्रवार दि. 1 ऑगस्टपासून ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात ही व्यवस्था कार्यरत असणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गेल्या आठ दिवसांत पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पोलीस आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. प्रत्येक मंडळांना आवश्यक परवानगी एकाच छताखाली मिळावी, यासाठी एक खिडकी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मंडप उभारणे, त्यासाठी वीजजोडणी, ध्वनीक्षेपक लावण्यासाठी परवानगी घेणे सक्तीचे आहे. त्यासाठी महानगरपालिका, हेस्कॉम, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम खाते व पोलीस खात्याची परवानगी लागते.
या सर्व खात्यांची परवानगी पोलीस आयुक्त कार्यालयात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या एक खिडकी योजनेंतर्गत मिळणार आहे. गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात अर्ज देऊन इतर सर्व विभागांची परवानगी एकाच ठिकाणी घ्यावी. यासाठी सीसीआरबीचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांची संपर्क अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली आहे. 9845110983 या क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. एक खिडकी केंद्र रोज दुपारी 2 ते रात्री 8 पर्यंत कार्यरत असणार आहे. प्रत्येक उत्सवाच्या आधी साऊंड सिस्टीमला परवानगी द्यायची की नाही, यावर पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होते. गणेशोत्सवाच्या काळातही कर्कश आवाजाच्या साऊंड सिस्टीमला परवानगी द्यायची की नाही, याची चाचपणी सुरू झाली आहे. गुरुवारी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी आदी अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत पोलीस परेड मैदानावर ध्वनी प्रदूषण दर्शविणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून साऊंड सिस्टीममुळे किती ध्वनी प्रदूषण होते, याची पाहणी केली.