ज्याची बुद्धी स्थिर असते त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात
अध्याय दुसरा
वेदात निरनिराळी कर्मकांडे केल्यावर अमुक अमुक फळ मिळेल असे सांगितले आहे पण ज्याचे कर्मफळावर लक्ष जडते त्याची बुद्धी विचलित होते. असे होऊ नये म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणाले, वेदातील विविध कर्मफलाच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्याचे स्वरूपी ज्या वेळी स्थिर होईल, त्या वेळी तुला समत्वरूप प्राप्त होईल. ज्याची बुद्धी स्थिर असते त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. असा योगी वागतो कसा, बोलतो कसा इत्यादि गोष्टींबद्दल अर्जुनाला मोठीच उत्सुकता लागून राहिली होती. म्हणून पुढील श्लोकात अर्जुन भगवंताना प्रश्न विचारतो आणि त्याच्या प्रश्नाचे भगवंतांनी दिलेले उत्तर स्थितप्रज्ञ लक्षणे म्हणून सुप्रसिद्ध आहे. अर्जुनाने भगवंतांना विचारले, हे केशवा! अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आहेत? तो स्थिरबुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो? कसा असतो? आणि कर्म कसे करतो?
स्थिरावला समाधीत स्थित-प्रज्ञ कसा असे । कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ।।54 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, अर्जुनाने भगवंतांना विचारले, हे केशवा! अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आहेत? तो स्थिरबुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो? कसा वागतो? कसा राहतो? आणि कर्म कसे करतो? ज्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली आहे व जो नेहमी समाधीसुखात रममाण झाला आहे, त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे. तो कोणत्या स्थितीत असतो? व कोणत्या प्रकारे आचरण करतो? हे कृपा करून मला सांगा.
यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य ह्या सहा गुणांनी संपन्न असलेले भगवान श्रीकृष्ण, स्थितप्रज्ञ योग्याची महती अर्जुनाला पुढील श्लोकातून सविस्तर सांगू लागले. ते म्हणाले, अर्जुना जो मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा सोडून देतो व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात.
कामना अंतरातील सर्व सोडूनि जो स्वये । आत्म्यात चि असे तुष्ट तो स्थित-प्रज्ञ बोलिला।।55।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, माणसाच्या मनामध्ये विषयाबद्दल असलेले अत्यंत प्रेम त्याला आत्मानंदाचा अनुभव घेण्यापासून दूर करते. ह्या विषयाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची ताकद एव्हढी जबरदस्त असते की, ती भल्याभल्यांना अध:पतित करते. जो सर्वदा तृप्त असतो, ज्याचे अंत:करण आत्मज्ञानामुळे नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते, त्याचेही ह्या विषयभोगाच्या ओढीने पतन होऊ शकते. संपूर्ण निरिच्छ आणि आत्मसंतोषात रममाण झालेल्याला स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी म्हणतात. त्याच्या मन:स्थितीबद्दल बोलताना भगवंत पुढील श्लोकात म्हणाले, दु:खात ज्याचे मन उद्विग्न होत नाही, ज्याला सुखाची लालसा नसते. ज्याच्या मनातून काम, क्रोध आणि भय ह्या भावना गेलेल्या असतात, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे.
नसे दु:खात उद्वेग सुखाची लालसा नसे । नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित-प्रज्ञ संयमी ।। 56 ।।
अशी स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झालेला मनुष्य स्वत:ला कर्ता समजत नसल्याने यशपयशामुळे सुखी वा दु:खी होत नाही. प्रारब्धानुसार वाट्याला येणारे सुख वा दु:ख स्वीकारून तो पुढे जात असतो. अर्जुना, त्या सत्पुरूषाचे अंत:करणातून काम क्रोध नाहिसे झालेले असतात. तो सुखदु:खाच्या प्रसंगी विचलित होत नसल्याने त्याला भविष्याची चिंता नसते. प्रपंच, प्रारब्ध आणि उपाधी त्याला कधी त्रास देत नाहीत.