महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवाला सोडून जो इतरांना भजेल तो पशु समजावा

06:23 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

उद्धव म्हणाला, गोविंदा तू जरी आता मला सोडून निजधामाला गेलास तरी तू सदैव माझ्या सान्निध्यात राहणार आहेस अशी तू केलेल्या उपदेशामुळे माझी खात्री झालेली आहे. तू सदैव बरोबर असल्यावर तुझ्या वियोगाचे दु:ख तसेच तू माझ्याबरोबर नसल्याने माझे कसे होणार म्हणून वाटणारी भीती आता पूर्णपणे नष्ट झाली आहे. त्यामुळे येथून पुढे मला कसलेच भय वाटणार नाही. तुझे सगुण रूप मी खरे धरून चाललो होतो पण तुझ्या उपदेशातून तुझ्या सर्वत्र अस्तित्वात असलेल्या सर्वव्यापी निर्गुण रुपाची ओळख तू मला करून दिलीस. त्यामुळे माझे अज्ञान नष्ट झाले.

Advertisement

देवा, अज्ञानाचे निरसन होण्यासाठी सत्संगाची अत्यंत गरज असते. सत्संगामध्ये तुमची संगती सगळ्यात उत्तम आहे. दीनजनांचा उद्धार व्हावा म्हणून हे निजात्मज्ञान तुम्ही प्रकाशात आणले. त्यांचे अज्ञान नष्ट व्हावे म्हणून तुम्ही हा ज्ञानदीप पूर्ण क्षमतेने प्रज्वलित केलात. ह्या दिव्यात विवेक आणि वैराग्याच्या वाती असतात. त्यामुळे महादिपाप्रमाणे त्याचा उजेड पडतो. ज्ञानदिपाच्या प्रभेमुळे आशेचा गडद पडलेला अंधार आणि अज्ञान नाहीसे होते.

अशा ज्ञानदिपाच्या प्रकाशात तुझे निजरूप तू मला दाखवलेस. तुझे अंतर्यामी स्वरूप तू मला ह्यापूर्वीच अर्पण केले आहेस. त्यामुळेच तुझे भजन करण्याची प्रेरणा मला मिळाली. तुझे भजन करणे म्हणजे सर्वभूती तुझे अस्तित्व मान्य करून सर्वांना साष्टांग नमन करणे होय. जो अशा पद्धतीने वागतो त्याची तुझे भजन करण्याची आवड आपोआपच वाढते आणि तो अहर्निश तुझे ध्यान करू लागतो. त्याचा परिणाम होऊन त्याची त्रिगुणांची साम्यावस्था गाठली जाते. त्याचे दुर्गुण आपोआपच नष्ट होतात आणि तो त्रिगुणांच्या पलीकडे जातो. त्यामुळे मुळातच त्याच्यात असलेले आत्मरूप उजळून निघते. अशा पद्धतीने जे मुळातच त्याच्याकडे असलेले आत्मरुपाचे ज्ञान तू त्याला पुन्हा अर्पण करतोस. ह्यालाच साधू आणि सज्ञान लोक ‘प्रत्यर्पण’ असे म्हणतात. आता माझा अनुभव तुला सांगतो. आत्तापर्यंत मी मायेने वेढला गेलेलो असल्याने माझ्या आत्मरूपाचे ज्ञान मला नव्हते परंतु तुझी भक्ती तू वाढवायला लावलीस. त्यामुळे माझ्याभोवती असलेले मायेचे पटल दूर झाले. त्यामुळे कधीही अच्छादली न जाणारी स्वरूपस्थिती मला अर्पण करून तू माझ्यावर फार मोठी कृपा केलेली आहेस. ह्याप्रमाणे भगवंता तुम्ही अतिकृपाळू आहात. तुमच्या दासांवर तुम्ही नेहमीच दया दाखवत असता. नशेत असलेला मनुष्य ज्याप्रमाणे काहीही बरळत असतो, कसाही वागत असतो त्याप्रमाणे काही लोक इतर कुणाचं ऐकून किंवा स्वत:च्या मनानं कुणाच्या तरी भजनी लागण्याच्या गोष्टी करतात. हृषीकेशी तुम्हाला सोडून जो इतरांना भजेल तो मनुष्य नसून पशु समजावा. मी असं म्हणतोय कारण देवा तुम्ही माणसाला बुद्धीचे वरदान दिलेले आहे. त्या बुद्धीचा उपयोग करून त्याने चांगले काय, वाईट काय हे ठरवावे आणि त्यानुसार वागावे अशी अपेक्षा असते.

परंतु तुम्हाला सोडून इतरांच्या नादी लागणाऱ्याने बुद्धीचा वापर केला असे म्हणता येत नाही. तुमचा उत्तमातला उत्तम सत्संग सोडून जो इतरांची संगत करेल त्याला पशुच म्हणावे लागेल. ह्याचा हरिभजनावर विश्वास नसल्याने त्याला नुसते पशु म्हणून भागणार नाही तर त्यांची गणना गाढवात करावी लागेल कारण सर्व पशुत गाढव सगळ्यात मूर्ख समजले जाते.

अशा लोकांना तू त्यांच्यावर केव्हढे उपकार करत आहेस ह्याची कल्पना नसते. माणसाची इंद्रिये सहसा बाह्य गोष्टींकडे आकर्षित होत असतात. त्यांना पूर्णपणे तेथून खेचून काढून तुम्ही त्यांना अंतर्मुख करता त्यामुळे मनुष्य ज्ञानाचा अधिकारी होतो. असे तुझे डोंगराएव्हढे उपकार माणसांच्यावर असताना त्या उपकारांचा ज्यांना विसर पडेल त्यांना खरोखरच कृतघ्न म्हणावे लागेल.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article