सद्गुरुंच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करणाऱ्याला अंतरनिष्ठ म्हणतात
अध्याय चौथा
बाप्पा म्हणाले, एकदा माणसाला राग अनावर झाला की, बळावलेला रजोगुण त्याला काम आणि क्रोधाची शिकार बनवतो. त्याला चूक काय बरोबर काय हेही कळायचं बंद होतं. तमोगुणाचा प्रभावही वाढू लागतो. हट्टी स्वभावामुळे त्याला मी करतोय तेच बरोबर आहे असं वाटू लागतं. असं चुकीचं वागणं हातून घडू नये म्हणून माणसाने सदैव ईश्वरस्मरण करावे म्हणजे ईश्वर कर्ता आहे हे सदैव लक्षात राहतं. त्याचा सत्वगुण वाढू लागतो आणि तो रज व तम गुणाचा प्रभाव कमी करतो. माणसानं स्वत:ला कर्ता समजू लागणं हे देहबुद्धीचं आणि देहाभिमानाचं लक्षण आहे असं झालं की, मी बळावतो आणि ईश्वराचा विसर पडतो म्हणून ईश्वराचा विसर पडणं घातक ठरू शकतं. म्हणून माणसानं सदैव ईश्वर स्मरणात रहावं. म्हणजे त्याला षड्रिपुंवर विजय मिळवता येतो आणि ते त्याच्या अंमलाखाली काम करतात, तेव्हा त्यांची जीवनशैली बदलून जाते. ती बदललेली जीवनशैली त्याला ब्रम्हप्राप्ती करून देते असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
अन्तर्निष्ठोऽन्तऽ प्रकाशोऽन्तऽ सुखोऽ न्तारतिर्लभेत् ।
असंदिग्धो?क्षयं ब्रह्म सर्वभूतहितार्थकृत् ।।24 ।।
अर्थ- ज्या अंतरनिष्ठ साधकाला प्रकाश, ज्ञान, सुख आणि रति प्राप्त झाली आहेत, जो संशयरहित झाला आहे व जो सर्व भूतांचे हित करण्यांत गढून गेलेला आहे, त्यालाच अविनाशी ब्रह्मप्राप्ती होते.
विवरण- बाप्पा म्हणाले, इंद्रियजय मिळवलेला साधक षड्रिपुंना त्याच्या गरजेनुसार वापरत असतो. त्याची सद्गुरुंवर अत्यंत निष्ठा असते. त्यांच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करत तो पुढे जात असतो. अशा साधकाला अंतरनिष्ठ असं म्हणतात. त्याला अंतरीचा प्रकाश दिसू लागतो. तो संपूर्णत: संशयरहीत असल्याने संपूर्ण समाधानी असतो. सर्वजण त्याला ईश्वररूपातच दिसत असल्याने त्याला त्यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटत असते. त्या प्रेमापोटी लोकसंग्रह करून त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणे हे लोककल्याणकारी कार्य तो निरपेक्षतेनं करत असतो. तो स्वत:ला कर्ता समजत नसल्यामुळे मी अमूक एव्हढं काम करीन, तमुक लोकांना तयार करीन असं कोणतंही उद्दिष्ट त्यानं ठेवलेलं नसतं. जशी ईश्वरी इच्छा असेल तेव्हढं कार्य पूर्ण होईल हे तो जाणून असतो. त्यामुळे ईश्वरी प्रेरणेनुसार कार्य करून आयुष्य व्यतीत केल्यावर शेवटी त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते.
एकदा श्री गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक समाजसेवक आले आणि म्हणाले, समाजाची पुष्कळ सेवा करायला मिळावी म्हणून भरपूर आयुष्य आणि द्रव्य मिळावं असा आशीर्वाद द्या. त्यांच्या मागणीचा हेतू चांगला होता परंतु देहबुद्धी जागृत असल्याने मी समाजसेवा करतोय असा भ्रम डोक्यात होता. हे लक्षात घेऊन श्रीमहाराज म्हणाले, तुम्ही समाजसेवा करताय ही गोष्ट चांगलीच आहे परंतु तुम्ही समाजसेवा करावी ही ईश्वराची इच्छा आहे हे ध्यानात ठेवा. स्वत:ची देहबुद्धी विसरण्याला फार महत्त्व आहे. त्याला तुमच्याकडून जेव्हढी सेवा करून घ्यायची असेल तेव्हढी तो करून घेईल, त्यासाठी द्रव्यही पुरवेल म्हणून हातून समाजाची जेव्हढी सेवा होत आहे ती ईश्वर माझ्याकडून करून घेत आहे ह्या विचारात राहून, सदैव ईश्वराचे स्मरण ठेऊन करत रहा. अशाप्रकारे वागत गेल्यास ईश्वर कर्ता आहे ह्याची जाणीव सदैव राहिल्याने तुमचे मन आणि बुद्धी त्याला आपोआपच अर्पण होईल. त्याच्याशिवाय अन्य विचार तुमच्या मनात येणार नाहीत. तुमच्या इच्छा नष्ट होतील आणि तुमचे मन ईश्वराच्या विचारांनी भरून जाईल.
इच्छा, द्वेष, सुख, दु:ख आणि अहंकार हे विकार माणसाला जन्मापासून चिकटलेले असतात. त्यांचा प्रभाव कमी करण्याची सुरूवात षड्रिपुंच्यावर विजय मिळवून होते असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
क्रमश: