महाराष्ट्राने मोदी बलवान
आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन म्हणजे मोदी सरकारकरता सुळावरची पोळी ठरणार की कसे? गौतम अदानी या वादग्रस्त उद्योगपतीमुळे संसदेत पुन्हा एकदा वादळ उठणार हे ठरलेले आहे. अमेरिकन न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटकेचे वॉरंट काढले असल्याने त्याचा आधार घेऊन पंतप्रधानांविरुद्ध राहुल गांधी यांनी अगोदरच आघाडी उघडली आहे. अदानी यांनी हे सारे बिनबुडाचे आरोप असून न्यायालयात धाव घेण्याची दाखवलेली तयारी हे सारे ठीक असले तरी या साऱ्या प्रकरणाने बरेच प्रश्न उपस्थित होतात. या साऱ्या प्रकरणाने मोदी सरकारविरुद्ध विरोधकांचा आवाज धारदार झाला आहे.
याउलट महाराष्ट्रात ज्याप्रकारे नरेंद्र मोदी आणि भाजपने विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे पानिपत केले आहे त्याने इतिहास घडवला आहे. कधीकाळी काँग्रेस विचाराचा म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र पूर्ण भगवा झालेला आहे. त्याने महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस आहेत. अर्धा डझन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेल्या काँग्रेसचा तर पुरता पालापाचोळा झालेला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची काही वेगळी स्थिती नाही. 2014 पेक्षा भाजपला जास्त जागा मिळण्याची चिन्हे असल्याने महाविकास आघाडीला जबर पिछाडी मिळालेली आहे. त्याने संसद सत्र सुरू झाल्यावर सभागृहात पंतप्रधानांच्या नावाचा जयघोष झाला नाही तरच नवल ठरेल. अखेर महाराष्ट्राला पूर्ण भगवा करण्यात भाजपला यश आलेले आहे. हरियाणासह विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश म्हणजे लोकसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्याने पिछाडलेली भाजप परत एकदा राष्ट्रीय स्तरावर फॉर्ममध्ये आली आहे. विनोद तावडे यांचे नाव एकेकाळी मुख्यमंत्रिपदासाठी होते पण आता ते मागे पडले आहे. संसद अधिवेशनापूर्वीच भाजपला बुस्टर डोस मिळाला आहे.
गुजरात, मध्यप्रदेश सारखा महाराष्ट्र देखील या निवडणुकीने भाजपमय झालेला आहे असे म्हणणे गैरलागू होणार नाही. काही विरोधी नेत्यांनी ही निवडणूक म्हणजे निवडणूकच नव्हती असे आता म्हणे हास्यास्पद ठरत आहे. मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या नेत्यात अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि शिवराज सिंग चौहान यांच्या यादीत आता फडणवीस आलेले आहेत.
काँग्रेसला आता केवळ महाराष्ट्राबद्दल नव्हे तर एकंदरच अंतर्मुख होणे गरजेचं आहे. दलित आणि मुस्लीम समाजाला एकत्र करून काँग्रेसने एक ‘खोटे नरेटिव्ह‘ लोकसभेत पसरवले असा भाजपचा आरोप होता. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं‘ चे नरेटिव्ह पसरवण्यात भाजप यशस्वी ठरले. आता काँग्रेसला सर्व थरावर प्रभावी रणनीती आणि नेतृत्व निर्माण करावे लागेल आणि ते जर राहुल गांधी बनवण्यात असफल ठरले तर महाराष्ट्रावर भाजपचा कब्जा राहणार आहे हे सांगायला कोणा राजकीय पंडिताची गरज नाही. निकालाच्या एक दिवस अगोदर शरद पवार यांच्यासारख्या जुन्याजाणत्या नेत्याने मविआला 157 जागा मिळतील असे भाकीत केले होते. त्यातील 100 जागा कोठे आणि कशा उडून गेल्या याबाबत गंभीर चाचपणी करावी लागेल. ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे म्हणणाऱ्यांची देखील हलाखीची परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षांकरिता आभाळच फाटले आहे.
पण या अधिवेशनात गाजणार ते अदानी प्रकरणच. जर विरोधी पक्षाच्या एकाद्या नेत्याने काही लाखाचा भ्रष्टाचार केला तर तो गजाआड जातो, हेमंत सोरेन सारख्या मुख्यमंत्र्याला देखील तुम्ही तुरुंगात डांबता. मग 2,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कथितपणे केलेल्या अदानीबाबत तुम्ही एकदम चूप का ? हा राहुल यांचा सवाल गैरलागू आहे असे म्हणता येणार नाही. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध राहुल यांनी ही मोहीम उघडलेली असली तरी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडालेले नाही असा भाजपचा दावा आहे. या दोन्ही परस्परविरोधी दाव्यांच्यामध्ये सत्य दडलेले आहे. सेबीच्या माधवी बुच यांनी अदानी यांची केलेली वादग्रस्त पाठराखण ‘सारे काही आलबेल नाही’ असेच दाखवते. पंतप्रधानांचे हितचिंतक असलेली काही मंडळी देखील कोणताही एक उद्योगपती मोदींच्या जवळचा आहे ही छबी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जगतात असणे हे सत्ताधाऱ्यांच्या हिताचे नाही, अशा कानपिचक्या देऊ लागले आहेत.
केनियाच्या संसदेत तेथील राष्ट्रपतींनी अदानी समूहाबरोबर असलेले सगळे समझोते रद्द केल्याची घोषणा गेल्या आठवड्यात टाळ्यांच्या गजरात केली याचा अर्थ प्रत्येकाने काढावयाचा आहे.
अदानी यांच्या या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये काही गैरभाजप राज्ये देखील सामील आहेत असे आरोप भाजप करत असल्याने त्याबाबत केंद्र का बरे कारवाई करत नाही? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना सतावणारा आहे. अशी कोणतीही चौकशी केंद्राने जाहीर केली तर तिला सर्वप्रथम अदानी यांची चौकशी करावी लागेल हे स्पष्ट आहे. अमेरिकेत गेली दीड वर्षे अदानी समूहाबाबत ही चौकशी सुरू होती पण त्या समूहाने सेबीला अंधारात ठेवले. एव्हढेच नव्हे तर असे काही सुरू नाही असा तत्सम खोटा खुलासा केला.
विरोधी पक्षांची इंडिया आघाडी या बाबतीत एकसंध राहणार. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष अदानीविरोधात केवळ उभा राहणार एवढेच नव्हे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीत अदानीचा मुद्दा पुढे करून भाजप आणि मोदींविरोधात आघाडी उघडणार असे स्पष्ट दिसत आहे.
कोणाला आवडो अथवा नावडो या सगळ्या प्रकरणाने भारतीय उद्योगाची जागतिक स्तरावर पत घसरली आहे आणि भारतीय राजकारणाला भ्रष्टाचाराचा मोठा डाग लागलेला आहे ही प्रतिमा दृढ होण्यास मदत झाली आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा‘ चा बोजवारा वाजला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे वादग्रस्त नेते अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बनत असताना अशा प्रकरणाने ते भारताला नाकेनऊ आणू शकतात असा एक मतप्रवाह आहे तर अमेरिकेकडून जास्तीतजास्त आयात करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होणार आहे.
मणिपूर मधील महावादळ
घडतय ते अजबच. गेल्या रविवारी गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात जोरदार प्रचार कार्यात मग्न होते. काहीही करून गड राखायचाच या निर्धाराने भाजप कामाला लागली होती. शहा यांच्या चार सभा अजून होणार होत्या तेव्हढ्यात नवी दिल्लीवरून एक फोन आला आणि त्यांना तडक राजधानीला परतावे लागले. संकटच तसे होते. मणिपूरमधील सात सदस्यीय नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) ने भाजपच्या वादग्रस्त बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा तडकाफडकी काढून घेतला आणि स्वत:ला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवणारा भाजप भानावर आला.
गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून मणिपूर पेटलेले आहे. एक अस्वस्थ शांतता तिथे आहे तिचा केव्हाही भंग होतो. शेकडो लोक रिलीफ कॅम्प मध्ये राहत आहेत.गेल्या आठवड्यात तेथील अशा एका रिलीफ कॅम्पवरच हमर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि सहा लोकांना पळवून नेले. त्यातील एक म्हातारी आई आणि तिच्या दोन मुलींचीही प्रेते नंतर जवळच्या एका नदीत तरंगताना आढळली.
एनपीपीने पाठिंबा काढून घेतल्याने बिरेन सिंग सरकार खचितच कोसळणार नाही पण त्यादिशेनेच त्याची वाटचाल मात्र सुरु झाली आहे. भाजपचे बरेच आमदार दिल्लीत बरेच दिवस तळ ठोकून आहेत. त्यांना श्रेष्ठींची भेट मिळत नाही आहे.
विरोधी पक्षांच्या वारंवार मागण्यांना न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजूनही जळत असलेल्या मणिपूरला भेट न दिल्याने एक वेगळाच वाद उभा राहिलेला आहे. तो भाजपसाठी फारसा चांगला नाही. पंतप्रधानांनी भेट दिलीच नाही आणि तेव्हढ्यात सरकार कोसळले तर भाजपला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भयानक टीकेला सामोरे जावे लागेल. एकीकडे महाराष्ट्राने मोदींना अभूतपूर्व यश दिलेले आहे तर दुसरीकडे अशांत मणिपूर त्यांच्या सरकारची परीक्षा घेत आहे आणि अदानीचे भूत त्याच्या मानगुटीवर बसलेले आहे असे अजब चित्र आहे.
सुनील गाताडे