इंद्रियांवर ताबा असतो त्याची इंद्रिये इच्छेनुसार वागतात
अध्याय दुसरा
स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना भगवंत म्हणाले, जो मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सोडून देऊन आत्मस्वरूपात संतुष्ट होतो, त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. त्याचे मन दु:खात उद्विग्न होत नाही, त्याला सुखाची लालसा नसते. त्याच्या अंत:करणातून काम, क्रोध आणि भय निघून गेलेले असते. ते विश्वचैतन्याशी एकरूप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो. त्यामुळे त्याला काही मिळाले असता उल्हासही वाटत नाही किंवा अमुक एक मिळाले नाही म्हणून रागही येत नाही.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे कासव त्याच्या इच्छेनुसार त्याचे अवयव सर्व बाजुंनी त्याच्या इच्छेप्रमाणे आत ओढुन घेते, त्याप्रमाणे तो पुरुष त्याची इंद्रिये, विषयापासून आवरून धरतो.
घेई ओढूनि संपूर्ण विषयातूनि इंद्रिये । जसा कासव तो अंगे तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली ।। 58 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंत अर्जुनाला कासवाचे उदाहरण देऊन त्यांचा मुद्दा समजावून सांगत आहेत.
ते म्हणाले, कासव ज्याप्रमाणे आनंदात असताना आपले अवयव पसरते आणि काही धोका दिसला की, ते आवरून घेते. त्याप्रमाणे जो साधक इंद्रियांवर ताबा मिळवतो त्याची इंद्रिये त्याच्या इच्छेनुसार वागतात. ज्याला हे शक्य होतं त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, असे समजावे.
पुढे धोका आहे असे दिसल्यावर कासव अंग आकसून घेते. त्याप्रमाणे अमुक कृत्य केले तर आपल्याला हानी पोहोचेल हे समजल्यावर तरी माणसाने त्या कृत्यापासून दूर रहावे. कासवासारख्या प्राण्याला हे जमू शकते मग माणसाने एव्हढे पथ्य पाळायला काय हरकत आहे.
उदाहरणार्थ डायबेटीस झालेल्या व्यक्तीने गोड खाणे हानिकारक आहे हे लक्षात घेऊन त्यापासून दूर रहावे. व्यवहारात अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील की, ज्या केल्यामुळे माणसाला हानी पोहोचते म्हणून त्या गोष्टी हेरून त्यापासून दूर राहिल्यास ती त्याच्या स्थितप्रज्ञ होण्याची सुरवात झाली असेही म्हणता येईल.
स्थितप्रज्ञाच्या आहाराविषयी बोलताना भगवंत म्हणतात, त्याचा आहार त्याच्या ताब्यात असतो. उचित आहार घेणाऱ्या पुरुषाला विषयसेवन नकोसे वाटते.
निराहार-बळे बाह्य सोडी विषय साधक । आंतील न सुटे गोडी ती जळे आत्म-दर्शने ।। 59 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, माणसाचे विकार त्याच्या आहारावर अवलंबून असतात. सात्विक आहार घेणाऱ्या माणसाचा स्वभाव सात्विक असतो. आपणहून कुणाला त्रास देण्याच्या फंदात तो पडत नाही. शरीरास जे अनुचित आहे, ते खायचे नाही म्हणजे निराहार असे विनोबा म्हणतात. ह्याबद्दल सांगताना माउली म्हणतात, साधक नित्य नियमाने जीभ सोडून इतर इंद्रियांच्यामार्फत भोगावयाच्या विषयांचा त्याग करतात पण जिभेला मात्र आळा घालत नाहीत.
जे जिभेला आळा घालू शकत नाहीत त्यांनी इतर विषय कितीही वर्ज्य केले तरी ते विषय त्यांना हजार मार्गाने येऊन चिकटतात. जिभेला आळा न घालता इतर विषयांचे सेवन टाळणे म्हणजे एखाद्या झाडाची फक्त वरवरची पाने, पालवी खुडून टाकायची आणि त्या झाडाच्या मुळाला पाणी घालायचे. असे केल्याने त्या झाडाला पुन:पुन्हा पालवी फुटणारच. मग त्या झाडाचा संपूर्ण नाश कसा होईल? उलट ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे आडव्या अंगाने अधिकच विस्तार पावू लागेल. त्या प्रमाणे ह्या जिभेच्या मार्फत विषयवासना पोसल्या जाऊन अधिकच वाढत राहतात.
क्रमश: