For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोगस डॉक्टराला एक आठवड्याचा कारावास; एक लाखाचा दंड

11:28 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बोगस डॉक्टराला एक आठवड्याचा कारावास  एक लाखाचा दंड
Advertisement

केपीएमई प्राधिकाराचा दणका : केरुर येथे वैद्यकीय कायद्याचे उल्लंघन

Advertisement

बेळगाव : केरुर (ता. चिकोडी) येथे वैद्यकीय कायद्याचे उल्लंघन करून बोगस पदवीच्या आधारावर क्लिनिक थाटलेल्या डॉक्टराला एक आठवड्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. केपीएमई नोंदणी आणि तक्रार निवारण प्राधिकारचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सदर आदेश बजावला आहे.रियाज अब्बास मुल्ला (रा. केरुर, ता. चिकोडी) याच्याकडून केरुर येथे मुल्ला क्लिनिक नावाने क्लिनिक थाटून वैद्यकीय व्यवसाय केला जात होता. याबाबत माहिती मिळताच चिकोडी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून क्लिनिकवर धाड टाकून तपासणी करण्यात आली होती. दि. 23 मार्च 2024 रोजी सदर क्लिनिकवर धाड टाकण्यात आली होती. कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे यादरम्यान आढळून आले होते. तसेच केपीएमई नोंदणी नसतानाही बोगस डॉक्टर व्यवसाय करत असल्याचे प्राथमिक तपासातून निदर्शनास आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा पंचनामा करून व निदर्शनास आलेल्या औषधांचा नमुना घेऊन सदर अहवाल जिल्हा केपीएमई नोंदणी आणि तक्रार निवारण प्राधिकारकडे दाखल करण्यात आला होता. केपीएमई समितीकडून रियाज मुल्ला हा बोगसपणे क्लिनिक चालवित असल्याचे निदर्शनास आले होते. यावरून बोगस क्लिनिक चालविणाऱ्या नकली डॉक्टर रियाज मुल्ला याला समितीसमोर चौकशीसाठी आणण्यात आले होते. दरम्यान प्राधिकारचे अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी केली असता तो बारावी शिकल्याचे सांगितले. वैद्यकीय पदवी घेतल्याची चौकशी केली असता कोणतीच पदवी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. याबरोबरच केपीएमईमध्ये नोंदणी केली नसल्याचेही आढळून आले. रियाज मुल्ला याने चौकशी दरम्यान नकली डॉक्टर असल्याचे कबूल केले. यावरून कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्था नोंदणी कायदा 2007, 2009, दुरुस्ती अधिसूचना 2018, नियम 19, उपनियम 1 याचे उल्लंघन केले असल्याचे जिल्हा केपीएमई समितीच्या निदर्शनास आले आहे. यावरून त्याला एक आठवड्याचा कारावास व एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.