खानापूर तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ परंपरा
नंदगड-गुंजी-ओलमणी-कुप्पटगिरी-करंबळ-माचीगड आदी गावांमध्ये परंपरा अखंडित
खानापूर : लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा गेल्या शतकापासून सुरू आहे. खानापूर तालुक्यात त्या काळी अनेक गावांतून सार्वजनिक गणपतीची परंपरा सुरू करण्यात आली. शतक महोत्सवाकडे वाटचाल करत ग्रामीण भागात ही परंपरा आजही टिकून आहे. यात नंदगड, गुंजी, ओलमणी, करंबळ, कुप्पटगिरी यासह अनेक गावात ही परंपरा आहे. हल्ली गणेश उत्सवाचे स्वरुप बदलले असले तरी काळानुरुप बदलत ही परंपरा आजही कायम आहे. यात तरुणांनी सहभागी होऊन ही परंपरा अखंड टिकविली आहे.
नंदगड येथे 81 वर्षांची परंपरा
नंदगड गावात विविध जाती-धर्माचे, भिन्न विचारांचे लोक असूनही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. किंबहुना या काळात एकात्मतेचे अलौकिक दर्शन घडते. नंदगड परिसरातील ग्रामीण भागातील जनता येथे बाजाराच्या निमित्ताने दर बुधवारी एकत्र येते. शिक्षण, दवाखाना व इतर कार्यालयीन कामासाठी नंदगडशी या लोकांचा रोजच संपर्क असतो. परिसरातील गावात नंदगडच्या संस्कृतीची छाप दिसून येते. या परिसरातील काही गावांतून एक गाव एक गणपतीची संकल्पना मूळ धरत आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांतून नंदगडात 1944 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज येथील गणेशोत्सव मंडळाने इतरांना प्रेरणादायी कार्य केले आहे. येथील गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात. मुख्य बाजारपेठेत गणेशोत्सव पूजला जातो. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाची धुरा युवकांनी आपल्या खांद्यावर घेतली असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आणि प्रबोधनाचे कार्यक्रम राबविले जात आहेत.
गुंजीत 74 वर्षांपासून परंपरा
गुंजीत विविध जाती-धर्म, पंथाचे लोक, अनेक संघ-संस्था, युवक मंडळे असूनही या उत्सवाच्या यंदा 74 व्या वर्षी एक गाव एक गणपतीची परंपरा अबाधित ठेवण्यात आली आहे. 1950 पासून येथे तत्कालीन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने उत्सव साजरा करण्यास सुऊवात केली. तेव्हापासून अखंडितपणे हा गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्या म्हणजे या गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. उत्सवादरम्यान विविध कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पंचक्रोशीतील खेड्यांतून अनेक गणेशभक्त व भाविक येथील कार्यक्रमात सहभाग व दर्शनासाठी गर्दी करतात.
ओलमणी गावात परंपरा अबाधित
ओलमणी गावातील मंडळाचे हे 63 वे वर्ष असून गावाने ही संकल्पना जोपासून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात अग्रेसर आहे. गावात विविध राजकीय पक्षांचे व विभिन्न विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत. मात्र गावातील सण, उत्सव, परंपरेनुसार एकत्रित गुण्यागोविंदाने साजरे करतात. येथे गेल्या 62 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तत्कालीन पंच मंडळींनी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माऊती मंदिरमध्ये गणेशोत्सवाला प्रारंभ केला. कालांतराने गावचा विस्तार व लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे गणेशोत्सवात सर्वांना सहभागी होता यावे, या उद्देशाने पंच मंडळींनी दरवर्षी गावातील प्रत्येक गल्लीला गणेशोत्सव साजरा करण्याची संधी दिली, आणि ती परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे गावातील ही परंपरा आजही अबाधित राहिली आहे. या माध्यमातून सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.
कुप्पटगिरीत परंपरा कायम
कुप्पटगिरी गावाने गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ 1968 साली रोवली. त्यावेळी खानापूर शहरात देसाई गल्ली येथे बाल मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थी दशेतील युवकांनी गणेशोत्सवाची कुप्पटगिरीत सुरुवात केली. एक गाव एक गणपती ही प्रथा अखंडित ठेवण्यासाठी विद्यमान कार्यकारी मंडळ प्रयत्नशील आहे. या मंडळाला पंच कमिटी, नागरिक व युवकांचे सहकार्य मिळत आहे. या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या मंडळाची आर्थिक स्थिती भक्कम असून निधीतून समाजपयोगी कामे राबविली जातात.
माचीगड येथे 24 वर्षांपासून
माचीगड येथे साहित्य संमेलनाची परंपरा आहे. त्याच अनुषंगाने युवकांनी 24 वर्षांपूर्वी गणेशोत्सवाची सुरुवात केली. एक गाव एक गणपती पूजनाचा निश्चय करून गावात एकच गणपती पूजण्याची परंपरा आजही कायम आहे. गणपती मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर हलसाल, अनगडी यासह अनेक दुर्गम गावांमध्येही एक गाव एक गणपती पूजनाची परंपरा आजही कायम आहे.
करंबळ येथेही 84 वर्षापासून परंपरा
करंबळ येथेही 84 वर्षांपूर्वी गणपतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आजही परंपरा कायम असून करंबळ येथे एक गणपती पूजला जातो. या मंडळाची धुरा आता युवकांनी सांभाळली असून गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबविण्याचा निश्चय केला असून डॉल्बी, डान्स स्पर्धा यांना फाटा देऊन भाषण स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. गेल्या 84 वर्षांपासून भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम आहे.