कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समोरच्याकडे स्नेहपूर्ण नजरेने पाहून आवश्यक तेव्हढे बोलावे

06:55 AM Jul 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय अकरावा

Advertisement

बाप्पा म्हणाले, तपाचे कायिक, वाचिक व मानसिक असे तीन प्रकार आहेत. कायिक तप माणसाच्या वर्तनाशी संबंधित असते. कितीही विचारपूर्वक वागणारा मनुष्य असला तरी कुठे ना कुठे तो चुकतोच व नंतर त्याला त्याबद्दल पश्चाताप करावा लागतो. अशी वेळ येऊ नये म्हणून त्याने स्वभावात ऋजुता, शौच, ब्रह्मचर्य व अहिंसा ही तत्वे मुद्दामहून रुजवावीत. त्यासाठी गुरु, ज्ञानी, ब्राह्मण आणि देव यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करावा. त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास हीच त्यांची पूजा होय. त्यापैकी गुरु, ज्ञानी, ब्राह्मण ह्यांचे महत्त्व आपण जाणून घेतले आता देवांचे महत्त्व समजून घेऊ.

Advertisement

देव : येथे देव म्हणजे परमात्म्याचे सगुण रूप असा अर्थ नसून, विभूतीयोगात ज्यांचा ईश्वराच्या विभूती म्हणून उल्लेख केलेला आहे ते सर्व होत. या सर्वांची पूजा म्हणजे त्यांच्यात असलेल्या सद्गुणांची पूजा होय. असे केल्याने आपल्या मनात त्यांच्या सद्गुणांची सतत उजळणी होत असते व वेळोवेळी आपल्या दैनंदिन जीवनात आपले वागणेबोलणे चुकू लागले की, ते सदगुण आपल्याला सावध करतात.

कायिक म्हणजे शरीराने करायच्या तपाबद्दल सांगून झाल्यावर बाप्पा वाचिक म्हणजे वाणीच्या तपाबद्दल पुढील श्लोकात सांगत आहेत.

मर्मास्पृक्च प्रियं वाक्यमनुद्वेगं हितं ऋतम् । अधीतिर्वेदशास्त्राणां वाचिकं तप ईदृशम् ।। 3।।

अर्थ-मर्माला स्पर्श न करणारे, प्रिय, उद्वेग न करणारे, हितकारक व सत्य असे भाषण व वेदशास्त्रांचे अध्ययन या प्रकारचे तप वाचिक तप होय. विवरण-अशी कथा सांगतात की, एकदा सर्व हत्यारांची सभा भरली होती. प्रत्येक हत्यार आपणच कसे सगळ्यात जास्त घातक आहोत ह्याचे वर्णन करण्यात धन्यता मानत होते. जीभ हे सगळं निमुटपणे ऐकत होती आणि मनातल्यामनात हसत होती. कारण दुसऱ्याचं मन दुखवण्यात जीभेइतकं घातक कोणतंच हत्यार नाही. सहज बोलता बोलता मनुष्य दुसऱ्याला दुखावत असतो. मग ती त्याच्या वागण्याबोलण्याची केलेली चेष्टा असेल, त्याचा चारचौघात केलेला अपमान असेल किंवा मागे भूतकाळात त्याने केलेल्या चुकांची उजळणी असेल. बोलणारा बोलून जातो पण ऐकणाऱ्याच्या मनाला कायमच्या यातना होत राहतात. एकवेळ इतर हत्यारांनी झालेल्या जखमा कालांतराने भरून येतात पण जिभेने केलेले घाव इतके खोलवर असतात की, ते कधीच भरून येत नाहीत आणि जेव्हा जेव्हा आपल्याला बोलून दुखावणाऱ्या माणसाची आठवण होईल तेव्हा तेव्हा त्याने केलेल्या आपल्या गोष्टी न आठवता त्याने आपल्याला बोलून दुखावलेल्या प्रसंगाची आठवण मात्र प्रकर्षाने होत असते. म्हणून बाप्पा सांगतायत की, कसं बोललं म्हणजे, समोरच्याला बरं वाटेल याचा अभ्यास करून माणसानं बोलण्यासाठी तोंड उघडावं. अन्यथा चुकीच्या पद्धतीने बोलण्याने कटुता निर्माण होते आणि नंतर कितीही प्रयत्न केले तरी ती मनातून जात नाही. ऐकणाऱ्याला आनंद होईल असं बोलणं हे एक तप आहे. तप म्हणजे निश्चयपूर्वक आचरणात आणण्याचे व्रत होय.

बाप्पा सांगतात, दुसऱ्याला लागेल असं बोलू नये. एखादी गोष्ट सत्य असली तरी ती समजुतीच्या स्वरात सांगावी. जेणेकरून समोरच्याला ती लागणार नाही. सांगणारा आपल्या हिताचं सांगतोय अशी त्याची भावना व्हायला हवी. थोडक्यात आवश्यक तेव्हढेच बोलावे अन्यथा गप्प बसावे हे श्रेयस्कर असते. बोलणे कसे असावे याबाबत माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात की, पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरें । शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ।। 13.263 ।। तैसें साच आणि मवाळ । मितुले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ।। 13.270।। समोरच्याकडे स्नेहपूर्ण दृष्टीने पाहून मग आवश्यक तेव्हढे बोलावे. ऐकणाऱ्याला त्यातली अमृताची गोडी आणि जिव्हाळा जाणवला पाहिजे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article