प्राण्यांबद्दल दयाभावना असायला हवी : मनेका गांधी
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अव्यवहारिक
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि पशूअधिकार कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भटक्या श्वानांविषयीच्या आदेशावरून कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्यायालयाने भटक्या प्राण्यांना पकडून शेल्टर होममध्ये ठेवण्याचा दिलेला आदेश अव्यवहारिक आहे. भारताला प्राण्यांबद्दल करुणेवर आधारित दृष्टीकोन अवलंबविण्याची गरज असल्याचे मनेका गांधी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शाळा, रुग्णालये, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक यासारख्या ठिकाणांवर श्वानांच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. न्यायालयाने अशा ठिकाणांवरील भटक्या श्वानांना हटवून त्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचा आणि राष्ट्रीय महामार्गावरील गुरांना हटविण्याचा निर्देश दिला होता. न्यायालयाचा निर्देश हा ‘करा परंतु कुणी करू शकत नाही’ स्वरुपाचा आहे. श्वान हटवा, मांजर हटवा, माकड हटवा आणि शेल्टरमध्ये ठेवा हे शक्य नाही, अशी टिप्पणी मनेका गांधी केली आहे.