For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंद्रियांशी समजुतीने व्यवहार करावा

06:39 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंद्रियांशी समजुतीने व्यवहार करावा
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा राजाला म्हणतात, मला शरण येऊन चित्तात साठवून ठेव. त्यातून मिळणारा आनंद विषयोपभोगांपासून मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाखमोलाचा असतो. एकदा तुला ह्या आनंदाची चटक लागली की, समोर दिसणाऱ्या वस्तूतील आनंद फारच किरकोळ वाटेल. इंद्रियांनी तुला कितीही मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तरी तू त्याला बळी पडणार नाहीस. समाधानी राहण्याची ही गुरुकिल्ली आहे. ह्याचा पडताळा घ्यायचा म्हटलं तर आई सतत आपल्या मुलाच्या आठवणीत रमत असते. त्याबदल्यात तू हवे ते माग असे तिला म्हंटले तर ती त्यासाठी कधीही तयार होणार नाही इतके तिला मुलाच्या आठवणीत राहणे प्रिय असते आणि त्यातच ती समाधानी असते.

बाप्पांनी सांगितलेल्या उपदेशानुसार जो वागत नाही तो सदैव असमाधानी असतो कारण त्याच्या इच्छा, वासना त्याच्यावर राज्य करत असतात. त्यामुळे त्याला राग चटकन येतो. एक इच्छा तृप्त झाली की त्यातून दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो. ह्या इच्छा करण्याला अंत म्हणून नसतो. आपल्या इच्छापूर्तीच्या, वासनेच्या आड कुणी येतंय असं दिसलं की, त्याचा राग येतो. हा क्रोध माणसाच्या अध:पतनाला कारणीभूत होतो असं बाप्पा आपण सध्या अभ्यासत असलेल्या

Advertisement

क्रोधादज्ञानसंभूति वभ्रमस्तु तत स्मृते । भ्रंशात्स्मृतेर्मतेर्ध्वंसस्तद्ध्वंसात्सो पि नश्यति ।। 60।। ह्या श्लोकात सांगत आहेत. क्रोधापासून अज्ञानाची उत्पत्ती होते, त्यापासून स्मृतिविभ्रम उत्पन्न होतो, स्मृतीभ्रंशापासून बुद्धीचा नाश होतो आणि त्यामुळे मनुष्य नाश पावतो. तो रागाच्या भरात काय वाटेल ते करतो कारण, अशा वेळेस त्याला ईश्वरी सत्तेचा विसर पडलेला असल्याने त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते आणि ती त्याचा सर्वनाश घडवून आणते. राग येऊन बुद्धी भ्रष्ट होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायची ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

विना द्वेषं च रागं च गोचरान्यस्तु खैश्चरेत् ।

स्वाधीनहृदयो वश्यै संतोषं स समृच्छति ।।61।।

अर्थ-द्वेष अथवा प्रेम रहित, अंत:करण स्वाधीन असलेला आणि ताब्यात असलेल्या इंद्रियांनी जो विषयांचे सेवन करतो तो समाधानी असतो.

विवरण-आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत असं दिसलं की, मनुष्याला राग येतो. इच्छापूर्तीच्या आड ज्या गोष्टी येत असतील त्यांच्यावर राग काढला जातो. त्याचा द्वेष केला जातो. याउलट जे इच्छापूर्तीसाठी अनुकूल असतील त्यांच्याबद्दल मनात प्रेम असते. वास्तविक पाहता झालेली इच्छा पूर्ण होणं व न होणं हे दोन्हीही आपल्या प्रारब्धानुसार घडत असतं आणि ते तसं घडण्यासाठी संबंधित वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती यांची ईश्वराने योजना केलेली असते. ही बाब जो लक्षात घेईल त्याला त्याच्या इच्छापूर्तीच्या आड जो येईल त्याचा राग येणार नाही व द्वेष वाटणार नाही. याउलट जो इच्छापूर्तीसाठी अनुकूल भूमिका घेईल त्याबद्दल प्रेमही वाटणार नाही. हा प्रारब्धयोगाचा सिद्धांत लक्षात घेऊन जो वागेल त्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात राहतील. जो सदैव ईश्वरस्मरण करेल त्याची बुद्धी कधीही भ्रष्ट होत नसल्याने वरील सिद्धांत तो विसरणार नाही. त्यामुळे विषयसेवन मिळालं तर ठीक नाही मिळालं तरी ठीक अशी मन:स्थिती तयार झाल्याने तो समाधानी असेल म्हणून कायम समाधानी राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे कायम ईश्वर स्मरणात राहणं हा होय.

समाधानी मनुष्य त्रिविध तापातून मुक्त होतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत.

त्रिविधस्यापि दुखस्य संतोषे विलयो भवेत् ।

प्रज्ञया संस्थितश्चायं प्रसन्नहृदयो भवेत् ।। 62।।

अर्थ-आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या दु:खाचा समाधानामध्ये लय होतो. मनुष्य स्थितप्रज्ञ असला म्हणजे प्रसन्नचित्त होतो.

                क्रमश:

Advertisement
Tags :

.