महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारची तीन दुचाकींना धडक, एक ठार

12:51 PM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देऊळमळ - केपे येथील घटना : कारने फरफटत नेल्याने अब्दुल बादशाहचा गेला बळी, एकजण जखमी : गाडीत सापडली गांजाची पाकिटे

Advertisement

वार्ताहर/केपे

Advertisement

देऊळमळ, केपे येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात कारने तीन दुचाकी वाहनांना धडक देत 30 मीटरपर्यंत फरफटत नेण्याचा प्रकार घडला. यात अब्दुल कादर बादशाह (26 वर्षे) याला मृत्यू आला, तर सोफियन शेख (24 वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर गोमेकॉत उपचार चालू आहेत. अपघातानंतरच्या कारवाईबाबत पोलिसांवर ग्रामस्थांकडून संशय व्यक्त करण्यात आला. अपघातस्थळावरुन कार घाईघाईने हटविण्यात आल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेवटी कारचालकास अटक करण्यात पोलिसांना यश आले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनात 12. 26 ग्रॅम गांजाची दोन पाकिटे सापडली आहेत. कारचालक रेनबर्ट थॉमस डायस (21 वर्षे, केपे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध अपघातप्रकरणी आणि गांजा सापडल्याप्रकरणी असे दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

अपघात झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून वाहन क्रेनद्वारे घाईगडबडीत हलविले तसेच या अपघातानंतर पोलिसांनी निष्काळजीपणा केलेला आहे, असा आरोप करत सोमवारी सकाळी 100 हून जास्त ग्रामस्थ केपे पोलिस्थानकावर दाखल झाले आणि त्यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांच्यासोबत केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, नगरसेवकही हजर होते. रविवारी रात्री देऊळमळ या भागातील काही युवक रात्री जेवण करून आपापल्या दुचाकींसह रस्त्याच्या बाजूने उभे होते. मात्र अचानक बामळमळहून देऊळमळच्या दिशेने येणाऱ्या स्कॉडा गाडीने तीन दुचाकींना धडक देत दोन युवकांना त्यांच्या दुचाकीसह 30 मीटरपर्यंत फरफटत नेले. यात अब्दुल कादर बादशाह हा ठार झाला, तर सोफियन शेख गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री 10.45 च्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामाही केला.

घाई गडबडीत पंचनामा का?

ही कार किती वेगात होती हे, जवळच असलेल्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जाणवते. त्या वाहनामध्ये चालकाच्या व्यतिरिक्त आणखी दोघे होते. गाडीच्या काचांचे फिल्मिंग करण्यात आले होते तसेच त्यात गांजा सापडलेला आहे, असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. मात्र या अपघाताचा योग्य रितीने पंचनामा करण्यात आलेला नाही. घाईगडबडीत क्रेनच्या मदतीने गाडी हलविण्यात आली, असा दावा करत आणि पंचनाम्याची प्रत सर्वांना दाखविण्यात यावी तसेच या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत सुमारे 100 हून जास्त ग्रामस्थांनी सोमवारी केपे पोलीस स्थानकावर गर्दी केली. यावेळी केपेचे आमदार डिकॉस्ता, नगरसेवक दयेश नाईक, प्रसाद फळदेसाई, गणपत मोडक व इतर हजर होते.

अब्दुलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

अपघातात ठार झालेल्या अब्दुलच्या घरात आणखी कोणी कमावती व्यक्ती नसून त्याच्या पश्चात पत्नी व 8 महिन्यांचे बाळ आहे. यावेळी केपेचे निरीक्षक अर्जुन  संगोडकर याची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. त्यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ग्रामस्थांना सांगितले आहे. यावेळी अपघाताबरोबर अमलीपदार्थांचा विषय चर्चेत आला. जी घटना घडली ती अत्यंत दु:खद आहे. पोलिस निरीक्षकांबरोबर चर्चा केली असून पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे, असे आमदार डिकॉस्ता यांनी सांगतले.

 अमलीपदार्थांवर कारवाईस पोलिस निरुत्सुक

केपे येथे अमलीपदार्थांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात आणि त्यासंबंधी अनेक ठिकाणे आहेत. यापूर्वी आपण त्या जागा अधिकाऱ्यांना दाखविल्या होत्या मात्र कोणीही त्यावर कारवाई केली नाही. पोलिसांना 10 तालांव द्या असे सांगितले, तर ते तत्परतेने कारवाई करतील. मात्र अमलीपदार्थांचे एक प्रकरण नोंदवून घ्या असे म्हटले, तर एक महिना गेला, तरी काही होणार नाही. कुठे काय चालते हे पोलिसांना माहिती आहे, पण ते काही करत नाहीत, असा आरोप दयेश नाईक यांनी केला. हवे असल्यास मी त्यांना सदर ठिकाणे पुन्हा दाखवायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

न्याय न मिळाल्यास मोर्चाचा इशारा

अपघातास कारणीभूत गाडीची तपासणी केली गेली, तेव्हा गाडीत अमलीपदार्थ सापडले. यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. तसेच सदर गाडी साध्या वेषातील पोलिसाने घाईगडबडीने क्रेनच्या मदतीने का बाजूला काढली याचीही चौकशी करावी. या प्रकरणी न्याय हा मिळालाच पाहिजे. जर न्याय मिळाला नाही, तर पोलिसस्थानकावर मोर्चा नेऊ, अशा इशारा नगरसेवक प्रसाद फळदेसाई. यांनी दिला.

अमलीपदार्थ सापडल्याचा आमदारांचा दावा

अपघातास कारणीभूत गाडीमध्ये अमलीपदार्थ सापडलेले असून त्यामुळेच अमली पदार्थांशी संबंधित फोरेन्सिक पथक बोलावले होते. यावरून केपेत अमलीपदार्थांचे व्यवहार चालतात हे सिद्ध होते, असा दावा आमदार डिकॉस्ता यांनी केला. यापूर्वी विधानसभेत आम्ही हा विषय मांडला होता. आता त्याला दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी यासंदर्भात कडक कारवाई करावी, असे ते म्हणाले.

पर्वरी अपघातात महिला ठार,स्कूटरचालक गंभीर जखमी,ट्रकची धडक बसल्याने अपघात

राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा झाल्यानंतरही 24 तासांपेक्षा कमी कालावधीत दोन प्राणघातक अपघातांची नोंद झाली आहे. केपे येथे झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने तीन दुचाकींना धडक दिली आणि त्यात अब्दुल कादर बादशाह जागीच ठार. पर्वरी येथे ट्रक आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात 46 वर्षीय महिला ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. संशयित ट्रक चालकाच्या विरोधात पर्वरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. तीन बिल्डिंग, पर्वरी येथील नवरत्न रेस्टॉरन्टजवळ दुचाकीला ट्रकची धडक लागून स्कूटर खाली पडली. स्कूटवर मागे बसलेली विजया मुरगावकर (वय 46, शिरेंत-चिंबल) या महिलेला गंभीर दुखापत झाली आणि उपचार घेत असताना तिचे निधन झाले.

स्कूटरचालक हिरालाल मुरगावकर (55) हे जखमी झाले आहेत. हा अपघात काल सोमवारी सकाळी 9.15 च्या सुमारास घडला. जखमी हिरालाल मुरगावकर हे एका महिलेसह जीए 07 व्ही 5205 क्रमांकाच्या स्कुटरवरून पणजीहून म्हापसाच्या दिशेने जात होते. त्याच दिशेने मोहम्मद अफजल हा जीए 05 टी 7979 क्रमांकाचा ट्रक घेऊन जात होता. ही दोन्ही वाहने नवरत्न रेस्टॉरन्टजवळ पोचली असता ट्रकची दुचाकीला धडक लागली. त्यामुळे दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी मागे बसलेली विजया ही ट्रकखाली आली आणि तिच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेले. गोमेकॉत दाखल केले असता डॉक्टरांना तिला मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक अरूण शिरोडकर व हवालदार विशाल गावस यांनी पंचनामा केला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article