कणकवली उड्डाणपुलावरील अपघातात भाजपच्या विभाग शक्ती केंद्रप्रमुखाचा मृत्यू
कणकवली / प्रतिनिधी
भाजपचे कळसुली विभागाचे शक्ति केंद्रप्रमुख शामसुंदर उर्फ शामा नाना दळवी (वय 65) यांचा शुक्रवारी रात्री दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात कणकवली मुख्य चौकांनाजीच्या तळेकर इलेक्ट्रॉनिक समोरील उड्डाणपुलावर घडला. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.
श्यामसुंदर दळवी यांच्या पश्चात मुलगा, पत्नी असा परिवार आहे. कणकवलीच्या माजी उपसभापती सुचिता दळवी यांचे ते पती तर जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सुगंधा दळवी यांचे ते काका होत. शुक्रवारी रात्री उड्डाणपुलावर अपघाताचा मोठा आवाज आल्याने उड्डाणपुलाखालील कार्यकर्त्यांनी तातडीने उड्डाणपुलावर धाव घेतली. यावेळी श्यामसुंदर दळवी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना तातडीने कणकवली रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर रुग्णालयात जि. प .माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे, स्वप्निल चिंदरकर, समीर प्रभूगावकर, बबलू सावंत, समीर सावंत आदी अनेक कार्यकर्त्यांनी धाव घेतली होती.