For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देव मिळण्यासाठी अभिमान सोडावा लागतो

06:46 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
देव मिळण्यासाठी अभिमान सोडावा लागतो
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

वरेण्य राजाने बाप्पांना विचारले की, त्रैलोक्यामध्ये आणि देवगंधर्वादि योनींमध्ये खरे सुख कोणते? राजाच्या प्रश्नाला उत्तरादाखल बाप्पा म्हणाले, माणसाला नेहमी आपण सुखात राहावं असं वाटत असतं पण तसं कायम घडत नाही. माणसाच्या जीवनात सुखदु:खाचं चक्र सतत सुरू असतं. मनुष्य सुख मिळवण्यासाठी वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती ह्यांचा आधार घेतो पण ह्या तीनही गोष्टींची अनुकुलता सदैव लाभत नसल्याने त्या प्रतिकूल झाल्या की, मनुष्य दु:खी होतो. पुन्हा सुखी होण्यासाठी या गोष्टी त्याला अनुकूल होण्याची वाट पहात बसतो किंवा त्यांना अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करत राहतो.

त्याचा असाही समज असतो की, स्वर्गलोकातील देव किंवा गंधर्व हे सर्वप्रकारच्या अनुकूलतेमुळे कायम सुखात रहात असतील पण देवलोकात किंवा गंधर्व लोकातही तेथील मंडळी चुकीच्या गोष्टीतून कायम टिकणारा आनंद हुडकत असतात. त्यामुळे पृथ्वीवरच्या घटनांपेक्षा तेथे वेगळं काही घडत नाही कारण काय केलं की, आपण कायम सुखात राहू याचं माणसानं शोधलेलं उत्तरच मुळात चुकीचं आहे. नष्ट होणाऱ्या गोष्टीतून आनंद मिळवण्याचा माणसाचा प्रयत्न असतो पण आनंद देणारी गोष्ट नष्ट झाली किंवा त्यातील अपूर्वाई संपली की त्यातील आनंदही नाहीसा होतो किंवा हळूहळू कमी होतो.

Advertisement

हे लक्षात आल्यावर नष्ट होणाऱ्या गोष्टीतून आनंद मिळवणे ही संकल्पना चुकीची आहे हे तो मान्य करतो. एकदा हे मान्य झालं की, कायम सुख मिळवण्यासाठी कायम टिकणारी म्हणजे अविनाशी गोष्ट कोणती याचा शोध घेतला असता ईश्वराशिवाय इतर कुणीही अविनाशी नाही असं उत्तर मिळतं हे आपण सध्या अभ्यासत असलेल्या आनन्दमश्नुतेऽ सक्तऽ स्वात्मारामो निजात्मनि । अविनाशि सुखं तद्धि न सुखं विषयादिषु ।।21 ।।  ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. त्यानुसार आतापर्यंत आजूबाजूच्या गोष्टीतून किंवा आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीतून कायम टिकणारे सुख मिळत नसल्याने त्या बाह्य गोष्टीतून सुख मिळवण्याचा नाद सोडून स्वत:च्या आत्म्याच्या ठिकाणी स्थिर असलेल्या ईश्वराची प्राप्ती करून घेतल्यास आपल्याला कायम टिकणारे सुख मिळते. बाप्पा पुढं म्हणाले, ईश्वरप्राप्ती झाल्यावर कायम टिकणारे सुख मिळते हे खरेच आहे पण ईश्वर प्राप्ती ही काही सहज साध्य होणारी गोष्ट नसल्याने त्यासाठी दीर्घ कालावधी लागतो पण म्हणून निराश व्हायचं कारण नाही.

ईश्वरप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न देखील आपल्याला आनंद देत असतात. त्यामुळे ईश्वर प्राप्तीसाठी केलेला लांबलचक प्रवास आणि त्यात येणाऱ्या अडीअडचणी आपल्याला जाणवतसुद्धा नाहीत कारण आपल्या प्राप्तीसाठी आपला भक्त प्रयत्न करतोय म्हंटल्यावर ईश्वर सदैव त्याच्याबरोबर राहून त्याला येणाऱ्या अडीअडचणी सुसह्य करतात. असा प्रयत्न करत जो ईश्वराशी संधान साधून असतो, नामस्मरणाने त्याच्या संपर्कात असतो त्यालाच कायम सुखाची प्राप्ती होते.

ईश्वरप्राप्ती होण्यासाठी देहाभिमान, ज्ञानाभिमान सोडावे लागतात. तसे केले की, बाह्य गोष्टींची आवड कमी होते व आपल्यातल्या ईश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. त्यासरशी आपल्या देहाचे आपल्याला जे महत्त्व वाटत असते तेही कमीकमी होऊ लागते. त्यामुळे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना शरीराला जाणवणाऱ्या सुखदु:खाची तीव्रता कमी होते. तसेच इतरही आपल्यासारखे ईश्वररूप आहेत हेही लक्षात येऊ लागते. हे जसजसे लक्षात येऊ लागते तसतसा आपपर भाव गळून पडतो. जो ह्या पद्धतीने ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो त्याची संपूर्ण जीवनशैली बदलून जाते. त्याच्या जीवनातून दु:ख कायमचे हद्दपार होते आणि आनंदाची कारंजी थुईथुई उडू लागतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.