‘वन गॉड, वन ह्युमॅनिटी, वन रिलिजन’ सनातनचा आवाज
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत : गुरुदेव रानडे मंदिर शताब्दी उत्सव : अकॅडमी ऑफ कम्पॅरिटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनतर्पे आयोजन
बेळगाव : जगामध्ये वेगवेगळे धर्म, पंथ दार्शनिक असले तरी सर्वांचा हेतू मात्र एकच आहे. गुरुदेव रानडे यांनी ‘वन रिलिजन, वन गॉड, वन ह्युमॅनिटी’ हा संदेश दिला आहे. हा भारतीय सनातन आत्म्याचा आवाज आहे. याकडे सर्व जगाने पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी भारत तयार झाला पाहिजे, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. हिंदवाडी येथील अकॅडमी ऑफ कम्पॅरिटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गोगटे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पद्मभूषणप्राप्त आचार्य कमलेशजी पटेल, गुरुदेव रानडे मंदिराच्या अध्यक्षा प्रा. अश्विनी जोग उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, वेगवेगळ्या मार्गाने सर्वांची वाटचाल सुरू असली तरी उद्देश मात्र एकच आहे. यासाठीच सर्वांनी समन्वय, सद्भावना, सभ्यता राखून वाटचाल करणे आवश्यक आहे. आपापल्या रस्त्याने, समन्वयाने, न भांडता जगाला पुढे नेले पाहिजे.
आपण सर्व जण एकाच ठिकाणी जाणार आहोत. कोणताच भेदभाव न ठेवता, मानवता हा उद्देश ठेवून पुढे जाणे गरजेचे आहे. एक धर्म, एक देव मानत असताना या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे. केवळ विचार करून चालणार नाही तर चिंतन केले पाहिजे. चिंतनाबरोबरच अनुभूतीचीही आवश्यकता आहे. वेगवेगळ्या धर्मांतून आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आपल्याला ते करायचे नाही. तुम्ही व आम्ही एकच आहोत, हा भाव सर्व धर्मांच्या वर आहे. त्यामुळे हा भावच आत्मा आहे. प्रत्येक धर्माचे मार्ग वेगवेगळे आहेत. मात्र सर्वांचा मानवता हाच उद्देश आहे. सत्य, करुणा, शुद्धता, तपस्या हा धर्माचा स्थायीभाव आहे. तपस्येतून शुद्धता येते. शुद्धतेतून करुणा, करुणेतून सत्य यावर जगातील सर्व धर्मांचा अभ्यास करून गुरुदेव रानडे यांनी विचार मांडले आहेत. मूर्तीसमोर नतमस्तक होणे हा प्रत्येकाचा भाव आहे. त्याप्रमाणे मूर्ती, आकार, रंग, प्रतिमा त्यानुसार भाव आहेत. विज्ञानही आज तर्क व गणिताच्या आधारावर विचार मांडत आहे, असे सांगत मत-मतांतरे असली तरी समभाव ठेवून वाटचाल केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मानसिक अनुभूती आवश्यक
यावेळी पद्मभूषणप्राप्त कमलेशजी पटेल म्हणाले, अध्यात्म अंधश्रद्धेविरोधात असणारा लढा आहे. अनेक तत्त्वज्ञानी पुस्तकांच्या माध्यमातून अध्यात्माबाबत विचार मांडण्यात आले आहेत. त्यामुळे अध्यात्मासाठी मानसिक अनुभूती घेणे आवश्यक आहे. यासाठी त्याप्रमाणे कृती करणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी अध्यात्माचे महत्त्व पटवून दिले. दरम्यान, मंदिराच्या अध्यक्षा प्रा. अश्विनी जोग यांनी सांगता भाषणात महत्त्वाचे विचार मांडले. मंदिराचा शताब्दी महोत्सव हा मोलाचा कार्यकाळ आहे. एखादी संस्था शंभर वर्षांनंतरही यशस्वी होत असेल तर त्यामागे वैचारिक बैठक, शुद्ध हेतू असावा लागतो. अनेक पिढ्यांनी योगदान दिल्याने ही संस्था दीपगृहाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे, असे मोलाचे विचार मांडत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी मान्यवरांकडून पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, कला, संस्कृती आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचा परिचय व स्वागत अॅङ एम. बी. जिरली यांनी करून दिला.