एक दिवस गोकाक जिल्हा केंद्र बनणारच!
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी : पुनर्विकसित गोकाक रोड रेल्वेस्थानकाच्या उद्घाटन समारंभात उपस्थिती
बेंगळूर : कोणीही काहीही म्हटले तरी एक दिवस गोकाक जिल्हा बनणारच! जिल्हा केंद्र घोषणेसाठी गोकाक रोड रेल्वेस्थानक अधिक बळ देईल, असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केले. अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेंतर्गत 17 कोटी रुपये खर्चुन पुनर्विकास केलेल्या गोकाक रेल्वेस्थानकाच्या उद्घाटन समारंभात दीपप्रज्वलन केल्यानंतर इराण्णा कडाडी बोलत होते. देशातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 86 जिल्ह्यांमधील रेल्वेस्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात आला आहे. यात बेळगाव जिल्ह्यातील गोकाक रोड रेल्वेस्थानक, धारवाड, बागलकोट, गदग, मुनीराबाद येथील रेल्वेस्थानकांचाही समावेश आहे. या पुनर्विकसित रेल्वेस्थानकांमुळे या भागातील जनतेला दळणवळणाच्यादृ-ष्टीने अनुकूल होणार आहे. पुढे ते म्हणाले, बेळगाव जिल्ह्याला सकाळच्या वेळेत बेळगाव-बेंगळूरदरम्यान वंदे भारत रेल्वे मंजूर करण्यात आली आहे. ही रेल्वे लवकरच सुरू होणार असून या भागातील जनतेला सोईस्कर ठरणार आहे. शिवाय बेळगाव-मिरजदरम्यान मेमू रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे.
याला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद
दिला आहे. भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक प्राधान्य दिले आहे. अमृत भारत रेल्वेस्थानकांच्या पायाभूत सुविधा आणि संपर्क वाढविण्यासह प्रवाशांना अधिक सुधारित अनुभव प्रदान करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे, असे ते म्हणाले. गोकाक रोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी नवी इमारत, पार्किंग आणि वाहनांसाठी क्षेत्र, प्रवाशांना नवीन ब्रिज, स्वच्छतागृह, लिफ्ट, प्रशस्त प्रतीक्षालय, आधुनिक प्रकाशयोजना, डिजिटल माहिती प्रणाली, नवे तिकीट काऊंटर आणि शुद्ध पेयजल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास केल्याबद्दल इराण्णा कडाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा आणि नैर्त्रुत्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी स्थानिकांनी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांना निवेदन देऊन गोकाक रोड रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा देण्याची विनंती केली. कार्यक्रमप्रसंगी माजी मंत्री आर. एम. पाटील, नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्य कमर्शिअल मॅनेजर डॉ. अनुप साधु, डीआरयुसीसी सदस्य फकिरगौडा सिद्धन्नावर, भाजप जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील आदी उपस्थित होते.