For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी बसमध्ये आढळला एक कोटीचा ऐवज

11:59 AM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
खासगी बसमध्ये आढळला एक कोटीचा ऐवज
Advertisement

भटकळ पोलिसांची कारवाई : मुंबईहून मंगळूरकडे निघालेल्या खासगी बसमधून रोख 50 लाखासह सोन्याचे दागिने, मोबाईल, पेनड्राईव्ह जप्त

Advertisement

कारवार : गोव्याहून बेंगळूरकडे खासगी बसमधून अनधिकृत 1 कोटी रुपयांची रक्कम गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवरील माजाळी (ता. कारवार) तपासणी नाक्यावर जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असताना मुंबईहून मंगळूरकडे निघालेल्या खासगी बसमधून वाहतूक होत असलेल्या सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा ऐवज भटकळ पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या ऐवजामध्ये 49 लाख 48 हजार 400 रुपये इतकी रोख रक्कम, 401-04 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 32 बांगड्या, एक मोबाईल फोन आणि एक पेन ड्राईव्हचा समावेश आहे. ही कारवाई भटकळ पोलिसांनी भटकळ येथील शमसुद्दीन सर्कलमध्ये करण्यात आली.

या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, मुंबईहून मंगळूरकडे निघालेली खासगी बस भटकळ पोलिसांनी शमसुद्दीन सर्कलमध्ये रुटीन तपासणीसाठी अडविली. तपासणीवेळी बसचालकाजवळ एक निळ्या रंगाची सुटकेस आढळून आली. सुटकेसच्या वजनामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी ती सुटकेस कुणाची आहे, असे प्रवाशांना विचारले. तथापि, प्रवाशांपैकी कुणीही ती सुटकेस आपली आहे, असे सांगितले नाही. त्यामुळे पोलिसांनी ती सुटकेस कुणाची आहे, असा प्रश्न बसचालकाकडे केला. त्यावेळी बसचालकाने ती सुटकेस मुंबई येथील एका अज्ञात व्यक्तीने आपल्याकडे दिली आहे आणि मंगळूर येथील इरफान नवाची व्यक्ती सुटकेस आपणाकडून कलेक्ट करेल, असे सांगून सुटकेस कलेक्ट करणाऱ्या व्यक्तीला बसचा क्रमांक दिला आहे, असे सांगितले.

Advertisement

बसचालकाने दिलेल्या उत्तराने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर पोलिसांनी ती सुटकेस ताब्यात घेवून उघडली असता तपासणी करणाऱ्या पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुटकेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राशिवाय मोठे घबाड आढळून आले. यामध्ये सुमारे 50 लाख रुपयांच्या 500 रुपये नोटांचे बंडल, 401.04 ग्रॅम वजनाच्या 32 सोन्याच्या बांगड्या, एक मोबाईल फोन आणि एक पेनड्राईव्ह आढळून आला.

बसचालक-क्लीनरची कसून चौकशी

सुटकेसमधील सर्व ऐवज जप्त करून पोलिसांनी बसचालकाची आणि क्लिनरची कसून चौकशी चालविली आहे. जप्त करण्यात आलेला ऐवज कुणाच्या मालकीची, कुणाकडे पाठविला जात होता? इरफान कोण? सुटकेसमधील ऐवज खरोखर मंगळूरला पाठविला जात होता का? भटकळ येथे उतरविण्यात येणार होता?, हवालाच्या माध्यमातून तर ऐवजची अनधिकृत वाहतूक करण्यात येत नव्हती ना? या प्रकरणामध्ये बसचालकाची नेमकी कोणती भूमिका राहिली आहे?, मुंबई सुटकेस बसचालकाकडे सोपविणारी ती अज्ञात व्यक्ती नेमकी कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासाअंती मिळणार आहेत. भटकळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.