चार अल्पवयीनांसह एका गुन्हेगाराला अटक
इचलकरंजी :
कबनूर येथे दादागिरी करत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाचा निर्घृण खून तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी जलदगती कारवाई करत चार अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम वायुकुमार कोळेकर (वय 25) यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित शुभम याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.
गुरु उर्फ प्रसाद संजय डिंगणे याचा कबनूर येथील एका हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर चाकूने वार करून खून करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमीच्या प्राथमिक चौकशीत हल्लेखोरांची नावे समोर आली. त्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तत्काळ तपास सुरू केला. पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुह्याची कबुली दिली. त्यानंतर शुभम कोळेकर यालाही कोल्हापूर मार्गावरून अटक करण्यात आली.
शुभम कोळेकरला पुराव्यांसह अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर ताब्यात घेतलेल्या पाच अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात दोन खून झाले. या दोन्ही खून प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयितांना अटक केली. खूननंतर काही तासांतच संशयित आरोपींचा शोध घेऊन कारवाई केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.