कर्जदारांच्या जाचाला कंटाळून लॉजमध्ये एकाची आत्महत्या
शिवाजीनगरमध्ये घटना : पाच जणांविरुद्ध गुन्हा
बेळगाव : कर्जदारांच्या जाचाला कंटाळून हळ्ळदकेरी (ता. हुक्केरी) येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवाजीनगर परिसरातील एका लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. महांतेश चंद्राप्पा मजत्ती (वय 56) असे त्याचे नाव आहे. महांतेशच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून लक्काप्पा हेग्गन्नवर रा. बेळगली, विरुपाक्षी पॅटी, रा. घोडगेरी, बाळाप्पा उप्पार, गटग्याप्पा मगदूम, गोपाल हुगार तिघेही राहणार हुक्केरी या पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महांतेशने आत्महत्या करण्यापूर्वी या पाच जणांची नावे एका चिठ्ठीत लिहून ती आपल्या खिशात ठेवली होती. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. या आधी महांतेश एका खासगी इस्पितळात काम करीत होता. सध्या शिवाजीनगरमधील लॉजमध्ये तो कामाला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो गावी गेला नाही. कुटुंबीयांनी फोनवरून त्याची चौकशी केली त्यावेळी आपण सध्या बेळगावात आहोत, नंतर गावाकडे येऊ असे सांगितले होते. शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास महांतेशने आपल्या मुलीला मॅसेज पाठविला.
मला माफ कर, असा तो मॅसेज होता. नंतर कुटुंबीयांनी तो बघितला. त्याआधी आपण गावाला जाणार नाही, येथेच झोपणार आहोत, असे सांगत महांतेशने एका खोलीची चावी घेतली होती. गुरुवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास तो झोपायला गेला होता. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजले तरी तो आपल्या खोलीबाहेर पडला नाही. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. पण दरवाजा न काढल्यामुळे दरवाजा फोडून खोलीत प्रवेश केला असता त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.