एक जळाले, बाकीचे रांगेत
कोल्हापूरचा अभिमान असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गेल्या चार दिवसांपासून या घटनेने महाराष्ट्राचे कलाक्षेत्र हळहळत आहे. लोकभावना विचारात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक खासबाग मैदानाचे जळलेले अवशेष आणि खाक झालेल्या नाट्यागृहाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्यसरकारचे 20 कोटी आणि विमा रकमेतून पाच कोटी खर्च करण्याचा शब्द दिला. हे नाट्यागृह सर्वांच्या सहकार्याने पुन्हा उभारू हे मुख्यमंत्री शिंदे यांचे दिलासाचे शब्द कोल्हापूरकर जनतेसाठी आश्वासक आहेत. कोल्हापुरातील इथली हौशी आणि कलाप्रेमी मंडळी या एका शब्दावर झटायला तयार होतील. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जिद्दीतून हे भव्यदिव्य नाट्यागृह साकारले. इथली वैशिष्ट्यापूर्ण वास्तूरचना अगदी शेवटच्या आणि कोपऱ्यातल्या प्रेक्षकासही रंगमंचावर चाललेला प्रयोग सहज पाहता येईल आणि शब्द न् शब्द संवादातील चढउतारांसह ऐकू येईल इतकी चांगली होती. सागवानी लाकडाने या वास्तूला एक वैशिष्ट्या प्राप्त करून दिले जे गेली 109 वर्षे दिमाख राखून होते. जनतेच्या मालकीचे हे नाट्यागृह दुरुस्ती देखभालीसाठी कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात होते. वेळोवेळी त्यांनी त्याच्या दर्जाशी तडजोड होणार नाही असा प्रयत्न करून ते जपण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र काळानुरूप वाढणारी बांधकामे, दूरचा विचार न करता तात्पुरत्या पद्धतीने केलेली मलमपट्टी किंवा आधुनिक यंत्रणा चालविण्याबाबत असलेले अज्ञान आणि अनास्था यांनी या नाट्यागृहाचा घात केला. जगात अशी अनेक वस्तूंची उदाहरणे आहेत जी नैसर्गिक आपत्ती आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडली किंवा त्यांच्या बाबतीत दुर्लक्ष किंवा घातपाताचा उद्देश ठेवून काही नुकसान करण्यात आले. त्यादृष्टीने याच्या तपासाचे काम स्वतंत्रपणे सुरू राहील. पण, हे नाट्यागृह जसेच्या तसे पुन्हा उभे राहणे आणि त्यात त्याची तीच वैशिष्ट्यो रसिकांना अनुभवायला येणे आवश्यक आहे. शिवाय यातून बोध घेऊन इतर नाट्यागृहे आणि संरक्षित वास्तूंच्या जतनाचा विचार सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी, विश्वस्त संस्थांचे पदाधिकारी करतील अशी अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारचा दौरा त्यादृष्टीने खूप मोलाचा होता. त्यांनी हळहळत न बसता हे वास्तव स्वीकारून नाट्यागृहाची जुनी वास्तू आधुनिक पद्धतीने वर उचलून घेता येईल का? पडझड झालेल्या ठिकाणचे बांधकाम जसे होते तसे करून त्याला आधूनिकदृष्ट्या अधिक भक्कम करता येईल का? त्यासाठी हेरिटेज वास्तू जतन करून बांधकाम करणारे लोक कुठे आहेत, कोण आहेत, त्यांनी अशी कामे कुठे कुठे केली आहेत याची माहिती दिली. त्यांची या कामासाठी मदत घेण्याचे आणि या कामात तकलादू वस्तू न वापरता पुढची दीडशे दोनशे वर्षे ही वास्तू जपता येईल असे काम करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. आपल्या अनुभवाचा लाभ या नाट्यागृहाच्या उभारणीत देण्यामागे त्यांची तळमळ आणि खासबाग मैदानातील इमारत उभी करण्यासाठी जुन्या छायाचित्रांचा, माहितीचा अभ्यास करण्याबाबत दिलेले आदेश महत्त्वाचेच. संगीतसूर्य केशवराव भोसले आणि राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना कोल्हापूरने आगीच्या तडाख्यानंतरही जपायचा निर्धार खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या महायुद्धात जळलेले पॅरिस तिथल्या जनतेने आणि राज्यकर्त्यांनी जिद्दीने पुन्हा उभे केले. मुळात
पॅरिसचे नुकसान होऊ नये म्हणून ते विरोध न करता नाझींच्या ताब्यात देऊनही नुकसान टळले नाही. पण, लोकांनी पुन्हा उभारणी केल्याच्या इतिहासाची जगाने ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने उजळणी केली. तीच कृती कोल्हापुरात घडण्यासाठी राज्यकर्त्यांचा शब्द विरुन न जाता प्रत्यक्षात आणण्यासाठी जनतेने जागृत राहिले पाहिजे.
अशा घटना का घडत आहेत याचा विचार राज्यातील कला रसिकांनीसुध्दा करण्याची आवश्यकता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, इचलकरंजी अशी काही नाट्यागृहे वगळता इतरत्र महिन्याला जेमतेम चार, पाच कार्यक्रम सुद्धा होत नाहीत. नाट्यागृहात तमाशा वा इतर कलाप्रकार खपत नाहीत. मुंबई, पुण्यात ज्यांच्या पहिल्या दहा रांगाही भरत नाहीत असे कलाकार, नाटककार ग्रामीण महाराष्ट्रात प्रयोग करायला अव्वाच्या सव्वा खर्च मागतात. ग्रामीण चौकोनी कुटुंबाला एक नाटक दोन हजाराला पडते. तो परवडत नसल्याने खरा रसिक येत नाही, परिणामी दाद नाही. त्यात अनेक नाट्यागृहांना वातानुकूलित यंत्रणा नाही. जिथे आहे तिथे नाटक करायला कलाकार खूश असतात. घामाघूम कलाकाराने थकून जीव धोक्यात का घालावा? अनेक पालिकांच्या नाट्यागृहात आधुनिक ध्वनी, प्रकाश योजना आहेत. मात्र त्या चालविता येणारा स्टाफ नाही. केशवराव भोसले सारख्या सर्वच नाट्यागृहात तंत्रज्ञ, वायरमन आणि इतर स्टाफ हा नाटक किंवा कार्यक्रमा दिवशी तेवढाच येतो. परिणामी दैनंदिन देखरेख नाही, अनेकांना जनरेटर सुरूच नाही हे वीज गेल्यानंतर समजते. केशवराव भोसले नाट्यागृह जळाले पण अशाच असंख्य महापुरुषांच्या आणि थोर कलाकारांच्या नावाने सुरू असलेली, बंद पडलेली आणि बांधकामाविना वर्षानुवर्षे पडून असलेली नाट्यागृहेही होरपळत आहेत. मुंबईत जे स्थानिक ते बाहेर सेलिब्रिटी ठरतात. तर आपापल्या विभागात स्थानिक कलाकारांना प्रयोग करायला लावून प्रोत्साहन दिले, त्याचवेळी प्रेक्षकही घडवले तर चांगल्या आणि व्यावसायिक कलाकृती ग्रामीण महाराष्ट्रातही उभ्या राहू शकतात. नाट्यागृहे जोमाने चालून मुंबई, ठाणे प्रमाणे वर्दळीची ठरतील. अनास्था, दुरावस्था आणि दुर्लक्ष जरी कमी झाले तरी किमान होरपळ बंद होईल. याचा विचार उर्वरित आणि बृहन्महाराष्ट्राने केला तरच या स्थितीतून मार्ग निघेल.