भटकळला 2 लाख 39 हजाराच्या अमलीपदार्थासह एकाला अटक
कारवार : इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि निकोटीन बाळगल्याप्रकरणी भटकळनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन 2 लाख 39 हजार रुपये किमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मकबुल इस्माईल मुडीकल (वय 50, रा. मगदूम कॉलनी, बंद रस्ता, भटकळ) असे आहे. भटकळ पोलिसांनी विश्वसनीय सुत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भटकळ येथील हुवीन चौक जवळच्या टाऊन सेंटरमधील रिम्स दुकानातून 2 लाख 39 हजार रुपये किमतीच्या वस्तू जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये 51 इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि 154 सिगारेटमध्ये भरण्यात आलेल्या निकोटीन लिक्वीवोसचा समावेश आहे.
कारवार जिल्हा पोलीस प्रमुख दीपन एम. एस., अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णमूर्ती जे. जगदीश, डीवायएसपी महेश एम. के. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भटकळनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाकर पी. आय., भटकळ शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नवीन एस. नाईक, उपनिरीक्षक तिम्मप्पा एस. यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दिनेश नायक, दीपक नाईक, महांतेश हिरेमठ, काशिनाथ कोटगोणशी, जगदीश नाईक, कृष्णा एस. जी., मल्लिकार्जुन उटगी, किरण पाटील, लोकेश कत्ती, रेवणसिद्धप्पा आदी कर्मचारी सहभागी झाले होते. भटकळ शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.