संसद घुसखोरी प्रकरणी बागलकोटमधून एकाला अटक
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा पुत्र चौकशीच्या फेऱ्यात
बेंगळूर : संसदेत घुसखोरी करून गोंधळ घातल्याप्रकरणी म्हैसूरमधील मनोरंजन याला अटक करण्यात आली होती. चौकशीवेळी त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री बागलकोट येथे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अटक केले आहे. तर दुसरीकडे म्हैसूरमध्ये सलून मालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. बागलकोटच्या विद्यागिरी येथील निवृत्त डीवायएसपीच्या निवासस्थानातून त्यांचा मुलगा साईकृष्ण जगली याला अटक करण्यात आली आहे. साईकृष्ण हा इंजिनिअर आहे. इंजिनिअरिंग शिक्षण घेताना मनोरंजन हा त्याचा ‘रुममेट’ होता. संसदेतील घुसखोरी प्रकरणी अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मनोरंजनची चौकशी चालविली. यावेळी त्याने साईकृष्ण जगली याचे नाव घेतले. त्यामुळे साईकृष्ण याला बुधवारी रात्रीच त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. साईकृष्ण हा बेंगळूरमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असून तो सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने घरीच काम करत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. याविषयी साईकृष्ण याची बहीण स्पंदना हिने आपल्या भावाने कोणतीही चूक केलेली नाही. दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी चालविल्याची बाब खरी आहे. आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य पेले आहे, असे सांगितले आहे. म्हैसूरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या सलून मालकाचे मनोरंजन याच्याशी आर्थिक व्यवहार होते. त्यामुळे सलून मालकाचीही चौकशी केली जात आहे.