Kolhapur News: गोबरगॅसच्या खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
स्वराच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे
सावर्डे बुद्रुक : केनवडे (ता. कागल) येथील दीड वर्षाच्या चिमुकलीचा घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. स्वरा पंकज पाटील असे तिचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. चिमुकल्या स्वराच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सकाळी पंकज पाटील यांची चिमुकली स्वरा हिला शौचालयाला झाले. तिच्या आजीने तिला शौचालयाला बसवले. त्यानंतर तिला घरात जायला सांगितले. मात्र स्वरा घरात न जाता खेळत घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्याजवळ गेल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.
आजीसह घरातील सर्वजण कामात व्यस्त होते. घरातील सर्वांना स्वरा आजोबा सोबत गावात गेली असेल असे समजून तिची चौकशी केली नाही. काही वेळानंतर स्वराचे आजोबा घरी आल्यानंतर त्यांनी चिमुकलीची चौकशी केली. त्यावेळी घरातल्यांनी तुमच्या सोबतच स्वरा आली असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी आपल्या सोबत नसल्याचे सांगताच कुटुंबीयांची धावपळ उडाली.
स्वराची शोधाशोध केली असता तिचा मृतदेह गोबर गॅसच्या खड्यामध्ये सापडला. घरातील लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी तिला दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गावावर शोककळा
स्वराच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. काही महिन्यांपूर्वीच पंकज पाटील यांनी एकुलत्या स्वराचा पहिला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता.