33 रुपयांच्या दाखल्यासाठी मोजावे लागतात दीड ते दोन हजार
कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
महा-ई-सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यासाठी नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. 33 रुपयांमध्ये मिळणाऱ्या दाखल्यासाठी केंद्र चालक तब्बल दीड ते दोन हजार रुपये उकळत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून प्रशासनाने केंद्र चालकांना केंद्राबाहेर दरसूची फलक लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे दाखले, तसेच शैक्षणिक बाबीकरिता, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे दाखले अशा विविध दाखल्यांची जनतेकडून मागणी होते. हे दाखले आपले सरकार सेवा केंद्र, सेतू कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने ऑनलाईन पध्दतीने दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाकडील शासन निर्णय 31 मार्च 2012 व सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील शासन निर्णय 23 मे 2012 अन्वये ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी दर निश्चित केले आहेत. यामध्ये 20 रुपये अधिक 10 रुपये महाऑनलाईन स्टँपड्युटी प्लस जीएसटी असे एकूण 33 रुपये 60 पैसे इतके आकारणे आवश्यक आहे. तसेच दरसूची दर्शनी भागामध्ये लावणे आवश्यक आहे.पण महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून एका दाखल्यासाठी तब्बल दीड ते दोन हजार घेतले जात आहेत.ही सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट असून नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे.
तालुका महासेवा ई केंद्र संख्या कार्यान्वित
आजरा 83 36
गगनबावडा 48 23
भुदरगड 125 49
चंदगड 123 58
गडहिंग्लज 90 35
हातकणंगले 147 85
कागल 143 76
करवीर 289 206
पन्हाळा 171 102
राधानगरी 139 76
शाहूवाडी 139 77
शिरोळ 119 53
एकूण 1616 876
- जादा पैसे मागितल्यास तक्रार करावी
महा ई सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यासाठी 33 रुपये 60 पैसे आकारण्यात येतात.परंतु,महा ई सेवा केंद्र चालकांकडून दीड ते दोन हजार रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर केंद्र चालकांना दरसूची फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणी जादा पैशाची मागणी केल्यास संपर्क साधावा.
नितीन धापसे-पाटील-नायब तहसीलदार
- शैक्षणिक सत्र सुरु झाल्यावर महा- ई- सेवा केंद्रांची सुगी
दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यावर शिक्षणासाठी विविध प्रकारचे दाखले प्रवेशासाठी जोडावे लागतात. त्यावेळी महा ई सेवा केंद्रांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होते.बऱ्याचवेळी सर्व्हर डाऊन होतो. यामुळे दाखले वेळेत मिळत नाहीत.अशावेळी महा- ई सेवा केंद्र चालकांकडून दाखले देण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
सचिन जाधव- कार्याध्यक्ष, युथ डेव्हलपमेंट फाऊंडेशन