रणजी करंडकावर मुंबईचे पुन्हा एकदा नाव
42 व्यांदा पटकावले विक्रमी जेतेपद, विदर्भावर 169 धावांनी दणदणीत विजय : मुशीर खान सामनावीर तर तनुष कोटियान मालिकावीर : बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव
वृत्तसंस्था /मुंबई
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने अंतिम लढतीत विदर्भाचा 169 धावांनी पराभव करत रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. विशेष म्हणजे, आठ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवताना मुंबईने विक्रमी 42 वे अजिंक्यपद पटकावले आहे. याआधी मुंबईने 2015-2016 मध्ये सौराष्ट्राचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. अंतिम लढतीत विदर्भानेही कडवा प्रतिकार करत मुंबईला सहज विजय मिळू दिला नाही. अक्षय वाडकर, करूण नायर आणि हर्ष दुबे यांनी डोंगराएवढे लक्ष्य गाठण्याचा आठोकाठ प्रयत्न केला खरा पण मुंबईच्या शिलेदारांनीही काही शेवटपर्यंत माघार घेतली नाही. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मुशीर खानला सामनावीर तर मालिकेत 502 धावा व 29 विकेट्स घेणाऱ्या तनुष कोटियानला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध विदर्भ असा फायनलचा थरार पहायला मिळाला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईचा पहिला डाव अवघ्या 224 धावांवर आटोपला. यानंतर मुंबईने विदर्भाला 105 धावांवर गुंडाळत तब्बल 119 धावांची निर्णायक आघाडी घेतली. या आघाडीच्या मदतीने मुंबईने दुसऱ्या डावात 438 धावा केल्या व विदर्भासमोर विजयासाठी 538 धावांचे कठीण लक्ष्य दिले. या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाने चौथ्या दिवशी 5 बाद 248 धावा केल्या होत्या. यामुळे विदर्भासमोर विजयासाठी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी 290 धावांचं कठीण आव्हान होतं. त्या तुलनेत मुंबई विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर होती. आज मुंबईने विदर्भचे 5 फलंदाज तंबूत धाडून विजय मिळवला.
अक्षय वाडकर, हर्ष दुबेकडून कडवा प्रतिकार
पाचव्या दिवशी 5 बाद 248 धावसंख्येवरुन विदर्भाने पुढे खेळायला सुरुवात केली. यानंतर संघाला कर्णधार अक्षर वाडकरकडून मॅचविनिंग इनिंगची अपेक्षा होती. पाचव्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात विदर्भ संघाने एकही गडी गमावला नाही, मात्र त्यानंतर दुसऱ्या सत्रात मुंबई संघाने दमदार पुनरागमन करताना तनुष कोटियानने अक्षय वाडकरला 102 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अक्षय बाद झाला आणि तिथेच हा सामना मुंबईच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. वाडकरने 199 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 102 धावांची खेळी साकारली. अक्षयला बाद झाल्यानंतर तुषार देशपांडेने हर्ष दुबेला बाद केले आणि विदर्भाला अजून एक मोठा धक्का दिला. हर्षने 128 चेंडूत 65 धावांची खेळी साकारली. आदित्य सरवटेही स्वस्तात बाद झाला. यानंतर कोटियानने यश ठाकूरला तर धवल कुलकर्णीने उमेश यादवला बाद करुन विदर्भचा दुसरा डाव 368 धावांवर संपुष्टात आणला. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर, करुण नायर, हर्ष दुबे यांनी कडवा प्रतिकार केला पण इतर फलंदाजांकडून त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. परिणामी त्यांना 169 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तनुष कोटियन सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 39 षटकात 95 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि ऑलराऊंडर मुशीर खानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलानीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव 224 व दुसरा डाव 418 विदर्भ पहिला डाव 105 व दुसरा डाव 134.3 षटकांत सर्वबाद 368 (करुण नायर 74, अक्षय वाडकर 102, हर्ष दुबे 65, अथर्व तायडे 32, अमन मोखडे 32, तनुष कोटियान 4 तर तूषार देशपांडे, मुशीर खान प्रत्येकी दोन बळी).
विक्रमी 42 वे जेतेपद आणि वानखेडेवर एकच जल्लोष
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईची यंदाच्या रणजी हंगामात जबरदस्त कामगिरी राहिली. उपांत्य फेरीत तामिळनाडूचा डावाने पराभव करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. यानंतर घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर अंतिम लढत जिंकत त्यांनी विक्रमी 42 वे अजिंक्यपद देखील पटकावले. अर्थात, मुंबईचे हे विक्रमी जेतेपद असून रणजी स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद मिळवण्याचा विक्रम मुंबईच्याच नावावर कायम आहे. गुरुवारी विदर्भावर 169 धावांनी विजय मिळवल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे, यंदाचे जेतेपद मुंबईसाठी खास ठरले. मुंबईने यापूर्वी 2015-16 मध्ये आपले शेवटचे जेतेपद जिंकले होते. यानंतर आठ वर्षानंतर त्यांना जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यश आले.
धवल कुलकर्णीला मुंबईचा अविस्मरणीय निरोप
मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने अंतिम सामन्याआधीच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेल्या धवलने 2007 मध्ये पहिल्यांदा मुंबई प्रथम श्रेणी सामना खेळला आणि आज आपल्या 17 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला निरोप देताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. सामन्यानंतर धवल चांगलाच भावूक झाला होता. मुंबईच्या खेळाडूंनी त्याला खांद्यावर घेऊन संस्मरणीय निरोप दिला.
धवल कुलकर्णी हा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा मित्र आहे. धवल कुलकर्णी आणि रोहित शर्माने अनेक वर्ष एकत्र प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले तसेच धवल हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा देखील भाग होता.टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने देखील मुंबईच्या विजयानंतर धवल कुलकर्णीसाठी खास इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली. त्याने धवल कुलकर्णीला मुंबईचा योद्धा असे संबोधले. त्याने सोशल मीडियावर धवलचा उल्लेख ‘मुंबईचा योद्धा‘ असा केला आणि त्याला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विजेत्या मुंबई व उपविजेत्या विदर्भावर बक्षीसांचा वर्षाव
गतवर्षी बीसीसीआयने रणजी ट्रॉफीतील बक्षिसाच्या रकमेत वाढ केली होती. यापूर्वी रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला 2 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 1 कोटी बक्षीस म्हणून देण्यात आले. मात्र आता बीसीसीआयने वाढवलेल्या बक्षीस रकमेनुसार यंदा रणजी करंडक जिंकणाऱ्या संघाला 5 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघालाही 3 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
53 वर्षानंतर दोन मराठमोळ्या संघांत झाली लढत
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं होणार आहे की, एकाच राज्याचे दोन संघ रणजी ट्रॉफीच्या फायनमध्ये पोहोचले. याआधी 1971 साली पहिल्यांदा असे झाले होते. त्यावर्षी मुंबईने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये महाराष्ट्राला हरवत जेतेपदाला गवसणी घातली होती. यानंतर तब्बल 53 वर्षानंतर एकाच राज्याचे दोन्ही संघ रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये लढणार आहेत. अर्थात, एकाच राज्यातील मुंबई व विदर्भ या दोन संघांतील ही महाराष्ट्र ‘डर्बी’ असली तरी जेतेपद मात्र महाराष्ट्रातच राहणार, हे निश्चित आहे. गुरुवारी म्हणजेच 14 मार्च रोजी 53 वर्षानंतर मुंबईने विदर्भाला हरवत जेतेपदाला गवसणी घातली.