बुधवारी शेअरबाजार अल्पशा तेजीसोबत बंद
सेन्सेक्स निर्देशांक 23 अंकांनी तेजीत, बँक निर्देशांक नुकसानीत
मुंबई :
बुधवारच्या सत्रामध्ये भारतीय शेअरबाजार अल्पशा तेजीसह बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. विविध निर्देशांकापैकी निफ्टी मिडकॅप निर्देशांक चांगल्या तेजीसमवेत बंद झाला होता.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 23 अंकांनी वधारत 64965 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 31 अंकांनी वाढून 19437 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारलेला होता. निफ्टी बँक निर्देशांक, निफ्टी फायनान्शीयल सर्व्हिस यांचा निर्देशांकसुद्धा नुकसानीत होता. दिवसभर शेअरबाजारामध्ये बुधवारी चढउतार पाहायला मिळाला. स्मॉलकॅप निर्देशांकदेखील 0.69 टक्के तेजीसमवेत बंद झाला. आयटी निर्देशांक मात्र 0.21 टक्के घसरणीत होता.
बीपीसीएल, अदानी पोर्टस, एशियन पेंटस् आणि सिप्ला यांचे समभाग सर्वाधिक लाभात असताना दिसून आले. दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस व टेक महिंद्रा या कंपन्यांचे समभाग घसरणीत असताना दिसले. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये बुधवारीदेखील घसरण पहायला मिळाली. त्यामुळे तेल कंपन्या व रंग कंपन्यांचे समभाग तेजीत असताना पहायला मिळाले.
अदानी समूहातील 9 लिस्टेड कंपन्यापैकी 7 कंपन्यांच्या समभागाच्या भावामध्ये वाढ दिसून आली. अदानी टोटल गॅस आणि एसीसी लिमीटेड यांचे समभाग घसरणीत होते. अदानी पॉवरचा समभाग सर्वाधिक 2.48 टक्के आणि अदानी पोर्टसचा समभाग 2.46 टक्के तेजी दाखवत बंद झाला. अदानी विल्मरचे समभाग 0.36 टक्के वाढत बंद झाले. मल्टी बॅगर समभाग ओम इन्फ्रा यांचे समभाग 105 रुपयांवर बंद होताना दिसले. महिंद्रा आणि महिंद्रा, कामधेनू लिमीटेड, गती लिमीटेड यांचे समभाग तेजीत तर दुसरीकडे टाटा मोटर्स, युनिपार्टस, एक्साईड इंडस्ट्रीज, जिओ फायनान्शीयल, देवयानी इंटरनॅशनल यांचे समभाग मात्र घसरणीत होते.