पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शिवमंदिरे दुमदुमली
श्रावणाला प्रारंभ झाल्याने शिवमंदिरांचा परिसर भक्तांनी फुलला : भक्तांचा उत्साह, दर्शनासाठी गर्दी, विविध धार्मिक कार्यक्रम
बेळगाव : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दक्षिण काशी कपिलेश्वर, मिलिटरी महादेव मंदिर, बिस्कीट महादेव मंदिर यासह इतर मंदिरांतून सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्रावणाला प्रारंभ झाल्याने शिवमंदिरांचा परिसर भक्तांनी फुलून गेला होता. सोमवारपासून श्रावणमासाला प्रारंभ झाल्याने धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलही सुरू झाली आहे. विविध मंदिरांमध्ये पूजा, महापूजा, अभिषेक, रुद्राभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. यंदा दि. 5, 12, 19 आणि 26 ऑगस्ट रोजी सोमवार आणि 2 सप्टेंबर रोजी पाचवा सोमवार आला आहे. विशेषत: यंदा सोमवारपासूनच श्रावणाला प्रारंभ होत असल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याबरोबरच पाच सोमवार आले असल्याने भक्तांमध्येही उत्साह वाढला आहे.
दक्षिण काशी दुमदुमली
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात पहिला श्रावण सोमवार अगदी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रविवारी रात्री 12 वाजता अभिषेक करण्यात आला. शहरातील जनतेच्या कल्याणासाठी कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्यावतीने हा अभिषेक करण्यात आला. सोमवारी पहाटे विशेष रुद्राभिषेक झाल्यानंतर त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 7 वा. पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. श्रावण सोमवारनिमित्त रात्रीपासूनच भक्तांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. सकाळी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यंदा भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आला आहे. एकूणच पहिल्या सोमवारी दक्षिण काशी दुमदुमलेली पाहायला मिळाली.
विद्युत रोषणाई अन् फुलांची सजावट
कपिलेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराच्या अंतर्गत भागात झगमगाट निर्माण झाला आहे. त्याबरोबरच वेगवेगळ्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचे आकर्षण वाढले आहे. वडगाव येथील शिवमंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनंतर विशेष फुलांची आरास करून पूजा करण्यात आली. दर्शनासाठी सकाळपासून मंदिरात भक्तांची वर्दळ होती. विशेषत: मंदिरात मूर्तीसमोर करण्यात आलेली आरास आकर्षक ठरत होती.