गणेशोत्सवनिमित्त शहरात रात्री उशिरापर्यंत धावणार बस
बेळगाव : गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात रात्री उशिरापर्यंत बससेवा उपलब्ध होणार आहे. पुणे, मुंबईबरोबर बेळगावातही मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. दरम्यान, हलते देखावे आणि गणेशमूर्ती पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होते. विशेषत: रात्री उशिरापर्यंत ये-जा सुरू असते. शिवाय शेवटच्या चार दिवसांमध्ये गणेश दर्शनासाठी गर्दी होते. याची दखल घेत परिवहनने रात्री उशिरापर्यंत शहरांतर्गत बसफेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वडगाव, मजगाव, अनगोळ, सह्याद्रीनगर, येळ्ळूर आदी मार्गांवर रात्री उशिरापर्यंत बसफेऱ्या धावणार आहेत. सद्यस्थितीत रात्री 10 वाजेपर्यंत बस धावतात. मात्र, गणेशोत्सव काळात उशिरापर्यंत बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढील चार दिवस शहरांतर्गत विविध मार्गांवर रात्री उशिरापर्यंत बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. शिवाय भक्तांची आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसफेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे.