For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दसऱ्यानिमित्त बेळगावकरांची कोट्यावधींची खरेदी

01:05 PM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दसऱ्यानिमित्त बेळगावकरांची कोट्यावधींची खरेदी
Advertisement

दुचाकी-चार चाकींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांना पसंती : गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला मागणी

Advertisement

बेळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बेळगावकरांनी कोट्यावधी रुपयांची खरेदी केली. केवळ सोन्यातच शंभर कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. सोन्यासोबतच दुचाकी, चार चाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू व कपडे खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बाजारात मोठी उलाढाल झाल्याने व्यापारीवर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात आले. दसऱ्यादिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून आहे. विशेषत: सोने-चांदीचे दागिने तसेच दुचाकी, चार चाकी वाहने खरेदीसाठी मोठा उत्साह असतो. दसऱ्यादिवशी खरेदी करता यावी, यासाठी वाहनांचे अगोदरच बुकिंग करण्यात आले होते. शनिवारी सकाळपासूनच दुचाकी व चार चाकी शोरुमसमोर वाहनांचा ताबा मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. वाहन खरेदी केल्यानंतर हिंडलगा येथील गणपती तसेच चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरासमोर पूजा करण्यासाठी नवीन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

इलेक्ट्रॉनिक बाजारातही उलाढाल

Advertisement

मोबाईलसह टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यासह इतर वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये गर्दी झाली होती. साप्ताहिक सुटी जोडून आल्याने खरेदीसाठी परगावच्या नागरिकांचीही गर्दी झाली होती. ऑनलाईनचा जमाना असला तरी दुकानांमध्ये जाऊन खरेदी करण्यावर ग्राहकांचा भरवसा असल्याने दुकानांमध्ये खरेदीसाठीचा उत्साह दिसून आला. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेतही लाखोंची उलाढाल झाली.

गुंतवणूक म्हणून सोने खरेदी

सोन्याचा दर वाढला असल्याने याचा परिणाम खरेदीवर होईल, अशी भीती सुवर्णकारांच्या मनात होती. परंतु प्रत्यक्षात मात्र बेळगावच्या नागरिकांनी शंभर कोटींहून अधिक दागिन्यांची खरेदी केल्याची माहिती सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी केवळ दागिने खरेदी न करता गुंतवणूक म्हणून शुद्ध सोने खरेदी करण्याकडे कल वाढला होता. बेळगाव शहरातील अनेक सुवर्णकारांकडे शुद्ध सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. माणिकबाग ऑटोमोबाईल येथे टाटा व सुझुकी, मंगेश होंडा येथे होंडा कंपनीच्या दुचाकी व चार चाकी, किया मोटर्स येथे चार चाकी तर पॅटसन येथे दुचाकी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. बेळगावच्या पोतदार ज्वेलर्स, व नवरत्न ज्वेलर्स येथे सोने खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. टिळकवाडी येथील बीएस्सी मॉल येथे शनिवारी तसेच रविवारीही खरेदीचा उत्साह दिसून आला.

लाभ घेण्याची सुवर्णसंधी

यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे. चांगला पाऊस झाल्याने बाजारपेठेत उत्साह आहे. दिवसेंदिवस सोन्याचे भाव वाढत असल्याने सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. चंदुकाका सराफ ज्वेल्स यांनी दसरा, दिवाळीनिमित्त विशेष ऑफर सादर केल्या आहेत. याचा फायदा घ्यावा. तसेच सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध असून ग्राहकांच्या आवडीच्या लाईटवेट दागिन्यांचाही समावेश चंदुकाका सराफ ज्वेल्स शॉपमध्ये आहे. विश्वसनीय सेवांचा लाभ प्रशस्त दालनामध्ये घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

- सिद्धार्थ शहा (संचालक, चंदुकाका सराफ ज्वेल्स)

Advertisement
Tags :

.