kolhapur News : किरणोत्सवाचा अखेरचा पाचव्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत!
पाच दिवसांच्या किरणोत्सवाची सांगता
कोल्हापूर : किरणोत्सवाचा अखेरचा पाचव्या दिवशी (गुरुवारी) मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणांपासून खांद्यापर्यंत पोहोचली आणि लुप्त झाली. ५ वाजून ४७ मिनिटांनी सूर्यकिरणांच्या आड ढगांची पुसटशी झालर आली. हवेतील बाष्पांचाही सूर्यकिरणांच्या प्रवासात व्यत्यय झाला होता. त्यामुळे सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहरा अथवा किरीटांपर्यंत जाऊ शकली नाही. तसेच अंबाबाईच्या मूर्तीवरुन लुप्त झाल्याची नोंद अभ्यासकांनी घेतली आहे.
दरम्यान, सायंकाळी पाच वाजता किरणोत्सवाला सुरुवात झाली होती. यावेळी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर आली होती. यानंतर पुढील ३७मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणे महाद्वारावरून गरुड मंडप, मंदिरातील गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरठा असे सर्व पार करत गाभाऱ्याच्या चांदीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली.
यावेळी सूर्य किरणांची तिव्रता फक्त २६ लक्स इतकी होती. याच तिव्रतेने सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश अंबाबाईच्यावर उभी आहे, त्या कटांजणाजवळ पोहोचली. पुढील काही क्षणातच किरणांनी अंबाबाईचे चरण स्पर्श केले. यानंतर किरणे चरणांवरुन वरवर सरकत अंबाबाईचा गुडघा, कमरेपर्यंत पोहोचली होती.
पुढील काही क्षणातच सूर्यकिरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंतही पोहोचली. त्यामुळे सोमवारप्रमाणे आजही सूर्यकिरणे अंबाबाईला सोनेरी अभिषेक करतील अशी चिन्ह निर्माण झाली होती. त्यानंतर सूर्यकिरणांच्या आड हवेतील बाष्प आले. पुसटसे ढगाळ वातावरणही सूर्यकिरणे अंबाबाईचा चेहरा, किरीटांपर्यंत जातेवेळी व्यत्यय होऊन गेले. यानंतर कोणाला काही कळायच्या आतच सूर्यकिरणे अंबाबाईवरुन लुप्त झाली. तसेच गेली पाच दिवस सुरु राहिलेल्या किरणोत्सवाची सांगताही झाली.