आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार तेजीसोबत बंद
सेन्सेक्स 591 अंकांनी तेजीत, आयटी समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी, ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सोमवारी चांगल्या तेजीसोबत बंद झालेला पहायला मिळाला. आशियाई बाजारातही मिळता-जुळता कल दिसून आला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 591 अंकांनी वाढत 81973 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 163 अंकांच्या वाढीसोबत 25127 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 समभाग मजबुतीसोबत बंद झाले तर 8 समभागांनी मात्र नकारात्मक कामगिरी नोंदवली. आयटी, ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची खरेदी गुंतवणुकदारांनी सोमवारी केल्याचे पाहायला मिळाले. ऑटो आणि मेटल क्षेत्राच्या निर्देशकांनी नकारात्मक कामगिरी केली. मंगळवारी ह्युंडाई इंडियाचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 17 ऑक्टोबरपर्यंत यामध्ये बोली लावता येणार आहे. ह्युंडाईचा समभाग 22 ऑक्टोबर रोजी शेअरबाजारात सूचीबद्ध होणार आहे.
हे समभाग तेजीत
सोमवारी हिंडाल्को, ट्रेंट आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज हे समभाग सर्वाधिक तेजीसह व्यवहार करीत होते. तर दुसरीकडे टीसीएच, महिंद्रा आणि महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत होते. सोमवारी विप्रो, कोल इंडिया, आयशर मोटर, अपोलो हॉस्पिटल, बीपीसीएल, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला, बजाज ऑटो, आयटीसी, इन्फोसिस, अदानी पोर्टस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, एशियन पेंटस् हे समभाग तेजीत होते. टाटा मोटर्स, टीसीएस, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, अदानी एंटरप्रायझेस, मारुती सुझुकी, ओनजीसी, हिंडाल्को यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.
विदेशी बाजारातील स्थिती
हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.75 टक्के घसरणीत होता. दुसरीकडे चीनचा शांघाय कंम्पोझिट 2.07 टक्के वाढत बंद झाला.