पहिल्याच दिवशी डी. के. सुरेश, प्रज्ज्वल रेवण्णा यांचे अर्ज
राज्यातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी अधिसूचना जारी झाली आहे. राज्यात 26 एप्रिल रोजी दक्षिण कर्नाटक भागातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. अधिसूचना जारी होताच पहिल्या दिवशी काँग्रेसचे विद्यमान खासदार डी. के. सुरेश यांनी बेंगळूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर निजद-भाजप युतीतर्फे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी हासनमधून अर्ज भरला आहे. राज्यात 26 एप्रिल आणि 7 मे अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. 4 एप्रिल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 5 एप्रिल रोजी अर्ज छाननी होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 8 एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. सुटीचे दिवस वगळता इतर दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल.
रोड शोद्वारे शक्तिप्रदर्शन
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी रोड शो करत शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. ते बेंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी रामनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी रोड शो केला. मंत्री रामलिंगारे•ाr, माची मंत्री एच. एम. रेवण्णा, आमदार इक्बाल हुसेन, बालकृष्ण, आनेकल शिवण्णा, एच. डी. रंगनाथ, युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास व हजारो कार्यकर्ते रोड शोमध्ये सहभागी झाले होते. तत्पूर्वी सुरेश यांनी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे आशीर्वाद घेतले. नंतर कुलदेवता केंकेरम्मा मंदिर व रामनगरमधील चामुंडेश्वरी मंदिरात विशेष पूजा केली.
देवेगौडांचे आशीर्वाद घेतले
खासदार प्रज्ज्वल रेवणणा यांनी हासनचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सी. सत्यभामा यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी मंत्री एच. डी. रेवण्णा, ए. मंजू, एच. सी. स्वरुप, सी. एन. बालकृष्ण उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रज्ज्वल यांनी होळेनरसीपूर तालुक्यातील मावीनकेरे येथील रंगनाथस्वामी मंदिरात पूजा केली. नंतर हरदनहळ्ळी येथील जन्मगावी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आशीर्वाद घेतले. देवेगौडा यांनी प्रज्ज्वल यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली.
सुरेश यांच्या मालमत्तेत पाच वर्षांत 259.19 कोटेंनी वाढ
उमेदवारी अर्जासोबत डी. के. सुरेश यांनी मालमत्तेची घोषणा केली आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेल्या अॅफिडेव्हीटमध्ये त्यांच्या मालमत्तेत पाच वर्षात 259.19 कोटेंनी वाढ झाल्याची माहिती दिली आहे. 2019 मध्ये सुरेश यांनी आपल्याजवळ 333.86 कोटींची मालमत्ता असल्याची घोषणा केली होती. आता त्यांनी सादर केलेल्या अॅफिडेव्हीटमध्ये एकूण 593.04 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. सुरेश यांनी आपल्याजवळ स्वत:चे वाहन नसल्याचे म्हटले आहे. तर 150 कोटी रुपये कर्ज असल्याचे सांगितले आहे.
प्रज्ज्वल यांच्या मालमत्तेत पाच वर्षात चारपट वाढ
हासनमधून उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या मालमत्तेत मागील पाच वर्षात चारपट वाढ झाली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या मालमत्ता तपशिलात आपल्याजवळ 40.85 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. हा आकडा 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा चारपट अधिक आहे. 2019 मध्ये त्यांनी आपल्याजवळ 9.78 कोटींची मालमत्ता असल्याचे सांगितले होते.