‘ओंकार’कडून बागायतीबरोबरच वाहनांचेही नुकसान
प्रतिनिधी / पेडणे
ओंकार हत्तीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेले अनेक दिवस बागायतींची नासधूस करत असतानाच आता चारचाकी गाड्या, तसेच दुचाकींची नुकसानी करण्याचे काम त्याने सुरू केले आहे.
ओंकार हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याकडे कोणतीच यंत्रणा नसल्याने वन खात्याचे कर्मचारी केवळ हातात सुतळी बॉम्ब आणि मशाली घेऊन हत्ती कुठून जातो? जाताना काय करतो? कुठे वास्तव्य करून राहतो? या पलीकडे ही यंत्रणा काहीच करू शकत नाही. सरकारनेही अजूनपर्यंत प्रशिक्षित माहुत हत्तींना आणण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या नाहीत, त्याबद्दल लोकांत नाराजी व्यक्त होत आहे.
कारची केली मोठी नुकसानी
ओंकारने आता बागायतींची नासधूस करण्याबरोबरच वाहनांचीही तोडफोड करायला सुऊवात केली आहे. मंगळवारी तीन वाहनांची तोडफोड केली होती, काल बुधवारी पुन्हा पहाटे एका कारची मोठी नुकसानी केली आहे.
दिवसा जंगलात, रात्री बागायतीत
ओमकार हत्ती दिवसा पोटभर खाल्ल्यानंतर घनदाट जंगलात जाऊन वास्तव्य करतो. सूर्य मावळतीकडे आल्यानंतर तो गुपचूपपणे लोक वस्तीमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर बागायतींमधील कवाथे, पोफळी यांची नासधूस करतो. मंगळवारी रात्रीही नुकसानी केली आहे.
सलग तिसऱ्या दिवशी नुकसानी
ओंकारचा काल बुधवारी उगवे परिसरातील तिसरा दिवस होता. बागायतदार, लोक तसेच वन अधिकाऱ्यांची या ओंकार हत्तीने झोप उडवलेली आहे. हत्तीच्या मागे मागे जाण्याशिवाय कर्मचारी व अधिकारी अन्य काहीच करू शकत नाही. सरकारची यंत्रणा कूचकामी ठरलेली आहे.
उगवेवासियांचा सरकारला इशारा
ओंकार हत्तीचा जर वेळेत बंदोबस्त वनखात्याने केला नाही, तर रस्त्यावर येऊन आंदोलन छेडण्याचा इशारा उगवेवासियांनी दिला आहे. कायदा हातात घेऊन काही वाईट घडलं तर त्याला पूर्ण जबाबदार सरकार आणि वन खाते असेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. सरकारला अजून कोणतीच जाग आलेली नाही. शेती, बागायती करणे आता किती अवघड झाले आहे, याची सरकारला कल्पना नाही काय? मोठ्या कष्टाने शेती, बागायती करायची आणि अशी मोठी नुकसानी सोसावी लागली तरी आम्ही जगायचे तरी कसे? असा सवाल शेतकरी, बागायतदारांकडून केला जात आहे.