अमिरातकडून ओमान 42 धावांनी पराभूत
कर्णधार वासीम, सामनावीर शराफू यांची अर्धशतके, सिद्दिकीचे 4 बळी
वृत्तसंस्था / अबुधाबी
कर्णधार मुहम्मद वासीम आणि अलिशान शराफू यांच्या अर्धशतकांच्या जोरावर तसेच जुनैद सिद्दिकीच्या भेदक गोलंदांजीमुळे सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सातव्या सामन्यात युएईने (संयुक्त अरब अमिरात) ओमानचा 42 धावांनी पराभव केला. या विजयामुळे युएईने सुपर-4 फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून युएईला प्रथम फलंदाजी दिली. युएईने 20 षटकात 5 बाद 172 धावा जमविल्या. त्यानंतर ओमानचा डाव 18.4 षटकात 130 धावांत आटोपला.
युएईच्या डावामध्ये कर्णधार मुहम्मद वासीमने 54 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 69 तर अलिशान शराफूने 38 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 51 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. मोहम्मद जोहेबने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 तर हर्षित कौशिकने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 8 चेंडूत नाबाद 19 धावा फटकाविल्या. युएईच्या डावात 7 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. ओमानतर्फे जितेन रामानंदीने 24 धावांत 2 तर हसनेन शहा आणि श्रीवास्तव यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ओमानच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज आणि कर्णधार जतिंदर सिंगने 10 चेंडूत 4 चौकारांसह 20, आर्यन बिस्तने 32 चेंडूत 2 चौकारांसह 24, विनायक शुक्लाने 2 चौकारांसह 20, रामानंदीने 2 चौकारांसह 13, शकिल अहमदने 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 14 धावा जमविल्या. 18.4 षटकात त्यांचा डाव 130 धावांत आटोपला. ओमानच्या डावात 2 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. युएईतर्फे जुनैद सिद्दिकीने 23 धावांत 4 तर हैदर अलीने 22 धावांत 2 आणि मुहम्मद जवादुल्लाहने 16 धावांत 2 गडी बाद केले. मोहम्मद रोहीदने 27 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : युएई 20 षटकात 5 बाद 172 (मुहम्मद वासीम 69, अलिशान शराफू 51, जोहंब 21, कौशिक नाबाद 19, रामानंदी 2-24, शहा आणि श्रीवास्तव प्रत्येकी 1 बळी), ओमान 18.4 षटकात सर्वबाद 130 (जतिंदर सिंग 20, बिस्त 24, शुक्ला 20, रामानंदी 13, शकिल अहमद नाबाद 14, अवांतर 16, सिद्दिकी 4-23, हैदर अली व जवादुल्लाह प्रत्येकी 2 बळी, रोहीद 1-27).