ओम प्रकाश यांच्या खुनाने पोलीस दल हादरले
बेळगावातही बजावली सेवा : कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या जाण्याने हळहळ
बेळगाव : निवृत्त राज्य पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचा खून झाला आहे. बेंगळूर येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नीनेच चाकूने भोसकून खून केल्याची बातमी येऊन धडकल्यानंतर बेळगावातही खळबळ माजली आहे. कर्नाटकातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाची ही पहिलीच घटना आहे. ओम प्रकाश यांनी बेळगावातही सेवा बजावली होती. बेळगाव उत्तर विभागाचे डीआयजी व आयजीपी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. बेळगाववर त्यांचे विशेष प्रेम होते. बेळगावात असताना त्यांनी उत्तम पद्धतीने पोलीस दलातील सेवा बजावली होती. पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांमध्येही ते लोकप्रिय होते. तरीही त्यांचा खून का झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दांडेलीजवळ खरेदी केलेली जमीन ओम प्रकाश यांनी अलीकडेच आपल्या बहिणीला दिली होती. मालमत्तेच्या वादातून पत्नीने त्यांचा काटा काढला आहे का? या दिशेने चौकशी करण्यात येत आहे. राज्य पोलीस महासंचालक दर्जाच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या खुनाची कर्नाटकातील पहिलीच घटना आहे. बेंगळूर पोलिसांनी त्यांची पत्नी पल्लवीची चौकशी सुरू केली आहे. उपलब्ध माहितीनुसार 16 मार्च 1996 पासून ते 27 मे 1997 पर्यंत बेळगाव उत्तर विभागाचे डीआयजी (डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस) म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. 22 ऑगस्ट 2001 रोजी आयजीपी म्हणून (इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस) ते पुन्हा बेळगावात रुजू झाले. 22 जुलै 2004 पर्यंत ते बेळगावात होते. क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथील शासकीय बंगल्यात त्यांचे वास्तव्य होते.
बेळगाव परिसरातही ओम प्रकाश यांचा मित्र परिवार मोठा आहे. बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड, गदग आदी जिल्ह्यांवर ते मुख्य होते. आपल्या कारकीर्दीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्याबरोबरच अनेक गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यातही त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक कलहामुळे ते त्रस्त होते. राज्य पोलीस महासंचालक पदावर असतानाही ओम प्रकाश यांनी अनेक वेळा बेळगावला भेटी दिल्या आहेत. मुलगा कार्तिक व मुलगीही काही वर्षांसाठी बेळगावात होते. बेळगाववर त्यांचे विशेष प्रेम होते. कौटुंबिक वाद व मालमत्तेच्या वादातून पत्नीनेच त्यांचा खून केल्यामुळे पोलीस दलातही प्रचंड खळबळ माजली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा बजावलेल्या बेळगावातील पोलीस अधिकाऱ्यांना याचा मोठा धक्का बसला आहे.