For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओम बिर्लांचीच निवड

06:22 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओम बिर्लांचीच निवड
Advertisement

लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. ही निवड परंपरेप्रमाणे बिनविरोध झाली असती तर अधिक शोभादायक झाली असती. पण, एनडीएच्या घटक पक्षांनी पाठींबा दिल्यावर आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांना निवडण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजीजू व विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या आसनावर नेले आणि सर्व तऱ्हेच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या या निवडीने सत्तारूढ एनडीए सरकारची पहिली परीक्षा पार पडली आहे. फ्लोअर टेस्टमध्ये नरेंद्र मोदी व त्यांची एनडीए  आघाडी यशस्वी झाली आहे. प्रतिपक्ष म्हणजे शत्रू किंवा विरोधी नव्हेत, असा डोस सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला असला तरी मोदी, शहा यांच्या भूमिकेत फारसा फरक पडलेला नाही. याचे दर्शन यानिमित्ताने देशाला आणि रा. स्व. संघाला झाले हे वेगळे सांगायला नको. आता लोकसभेचे उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेतेपद खरेतर या निवडी सहमतीने बिनविरोध करण्याची परंपरा आहे. यंदा प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवड झाली आणि आता उपाध्यक्षपदासाठी काय होते ते पहायचे. पण, एकूण चाल पाहता भाजप अपक्षांना सहयोगी करून आपले संख्याबळ 272 पेक्षा अधिक करण्याच्या पवित्र्यात दिसतो आहे. अध्यक्ष अर्थात सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दिल्लीत खलबते होत होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा त्यात पुढाकार होता. राजनाथ सिंह व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे फोनवरून संभाषण झाले होते. खर्गे यांनी विरोधी इंडिया आघाडीला उपाध्यक्षपद द्या तर बिनविरोध करू असे म्हटले होते. राजनाथ सिंह यांनी रात्री फोन करतो असे सांगून वेळ मागून घेतली. पण, फोन वगैरे काही केला नाही. कदाचित हा रणनितीचा भाग असू शकतो. पण, काँग्रेसने केरळचे के. सुरेश यांचा अर्ज भरून ठेवला होता. के. सुरेश हे ज्येष्ठ खासदार आहेत. 1989 सालापासून त्यांचा लोकसभेशी संबंध आहे. एनडीए  आघाडीने ओम बिर्ला यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. लोकसभेचे अध्यक्षपद किती महत्त्वाचे याचा अनुभव भाजपच्या गाठीशी आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अवघ्या एका मताने पडले तेव्हा अध्यक्ष आपलाच पाहिजे हे अधोरेखीत झाले होते. त्यामुळे भाजपा अध्यक्षपदासाठी ठाम होते. एनडीए मधील घटक पक्षांनाही त्यांनी सोबत घेत ओम बिर्लांचे नाव पुढे केले होते. ओघानेच पंतप्रधान तेच प्रमुख मंत्री व त्यांची खाती तीच आणि लोकसभेचे अध्यक्षही तेच अशी रचना कायम ठेवण्यात भाजपला यश आले आहे. ओम बिर्ला राजस्थानमधील कोटा भागाचे प्रतिनिधीत्व करतात. ते कॉमर्स शाखेचे पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आहेत. सभागृह कौशल्यपूर्ण हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. शेतकरी व समाजसेवा यात त्यांचा लौकीक असला तरी मावळत्या सभागृहात मोठ्या संख्येने दंगा करणाऱ्या विरोधी सदस्यांना निलंबीत केले. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेस व भाजपा विरोधकांचा रोष आहे. पण, आता त्यांची लोकसभेच्या अध्यक्षपती आवाजी मतदानाने निवड झाली आहे. मतदानाने निवड होणारे ते पहिले अध्यक्ष आहेत. दरम्यान, लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहूल गांधी यांची निवड झाली आहे. सतराव्या लोकसभेत काँग्रेसने शतक व इंडिया आघाडीने सुमारे दोनशे संख्याबळ गाठले आहे. ओघानेच काँग्रेसचा व मित्र पक्षाचा आवाज व आवाका विस्तारला आहे. मागील लोकसभेत कुणालाही पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपद नव्हते. पण, आता सत्ताधारी एनडीएवर आघाडीतून आणि विरोधातून चांगला अंकुश निर्माण झाला आहे. तोंडावर महाराष्ट्र, हरियाणा अशा काही विधानसभेच्या आणि मुंबईसह काही महापालिकेच्या निवडणुका आहेत. भाजपा त्यामध्ये कसा प्रतिसाद मिळवतो ते बघावे लागेल. पण, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे म्हणणाऱ्या भाजपात महाराष्ट्रात निवडणूक काळात साडेचारशे कोटी रूपयांचा गफला झाला अशी चर्चा आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या पराभवाची कारणे तपासली जात आहेत. त्यामध्ये हे प्रमुख कारण पुढे आले आहे. आता नरेंद्र मोदी हे आघाडीचे सरकार कसे चालवतात, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार आदी ठिकाणी पक्षाची छबी कशी सुधारतात आणि दिल्लीतील सरकार भक्कम करण्यासाठी ऑपरेशन कमळ कसे कुठे चालवतात हे बघावे लागेल. राजकारणात सत्ता हाच श्वास असतो. बाकी सारे नंतर हेच सूत्र भाजपासह सर्वांचे आहे. विरोधी इंडिया आघाडीतही सारे ऑल वेल नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे रोज कुणाकुणाला अंगावर घेत असतात. त्यांचा शरद पवार व काँग्रेस लाभ घेत असतो. लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले. आता महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू होईल या अधिवेशनात निवडणूक तोंडावर ठेवून अनेक घोषणा होतील पण, आरक्षणाचा पेच आणि सर्वांचे समाधान कठीण दिसते. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून महाराष्ट्रातील नेते उठाबशा काढत होते. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पक्षाचे काम करण्याचा निर्धार केला आहे. राज्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या विधानपरिषद जागांसाठी बुधवारी मतदान झाले आहे. मुंबईत या निवडणुकीसाठी भाजपा व ठाकरे सेना यांच्यात जुंपली आहे तो निकाल काय येतो हे महत्वाचे. तूर्त मंत्रीमंडळ विस्तार पुढे गेला आहे. विधीमंडळ अधिवेशनानंतर तो होईल. पण, विधानसभा निवडणूक काँटे की टक्कर होणार हे दिसते आहे. शरद पवारांनी श•t मारला आहे. पुन्हा काही नेते इकडे तिकडे करताना दिसत आहेत. तूर्त आजचा दिवस भाजपाने एनडीए आघाडीने पदरात पाडून घेतला आहे. सभापतीपदी ओम बिर्ला विजयी झाले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची फ्लोअर टेस्ट झाली आहे. देशभर चांगल्या पावसाच्या वार्ता आहेत आणि राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यानंतर राहूल गांधी हे गांधी परिवारातले तिसरे सदस्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले आहेत. आता सारे मिळून कसे काम करतात हे बघायचे. पण, देश जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवायची असेल आणि सर्वसामान्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचवायचा असेल तर देशकल्याणासाठी सर्व सहमती गरजेची वाटते. ओम बिर्ला त्यासाठी कसे योगदान देतात हे पाहण्यासारखे ठरेल ओम बिर्लांना फेरनिवडीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Advertisement

Advertisement
Tags :

.