ऑलिम्पियाड विजेत्या भारतीय बुद्धिबळपटूंचे जल्लोषात स्वागत
वृत्तसंस्था/ चेन्नई
ऑलिम्पियाडमध्ये इतिहास घडविणाऱ्या सुवर्णपदकांच्या कमाईनंतर तेजस्वी स्मित करत भारताच्या बुद्धिबळ संघांच्या सदस्यांचे मंगळवारी येथे आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेले चाहते, अधिकारी आणि खेळाडूंच्या कुटुंबियांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, आर. वैशाली आणि पुऊष संघाचा कर्णधार श्रीनाथ नारायणन ही चौकडी मंगळवारी सकाळी येथे दाखल झाली.
भारतीय पुऊष आणि महिला या दोन्ही संघांनी रविवारी हंगेरीतील बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपापले पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. होता. त्यांच्या या विलक्षण विजयाने बुद्धिबळातील एक ‘नवीन पॉवरहाऊस’ म्हणून भारताचे स्थान बळकट केले आहे. अपेक्षेप्रमाणे वरील विमानतळावरून सदर बुद्धिबळपटू बाहेर पडताच मोठा जल्लोष झाला.
स्पर्धेत अपराजित राहत भारतीय पुऊष संघाने गाजविलेल्या वर्चस्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या गुकेशने कॅमेऱ्यांसमोर आपले वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदक दाखविले. एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा जिंकून जगज्जेतेपदासाठीचा सर्वांत तऊण आव्हानवीर बनल्यानंतर आता हा 18 वर्षीय खेळाडू नोव्हेंबरमध्ये चीनच्या डिंग लिरेनविऊद्ध होणार असलेल्या जागतिक विजेतेपदासाठीच्या लढतीची तयारी करू लागला आहे. गुकेशने यावेळी सांगितले की, हे यश खूप खास आहे, कारण दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकले आहे.
प्रज्ञानंद आणि वैशाली नारायणन ही भाऊ-बहीण जोडी गुकेशच्या आधी पोहोचली. या सर्वांचे हार, पुष्पगुच्छांनी स्वागत करण्यात आले. चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठीही गर्दी केली. महिला संघाच्या विजयाचा पाया रचणाऱ्या वैशालीने सांगितले की, हा एक स्वप्नवत क्षण आहे. गेल्या वेळी चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये आम्ही कांस्यपदक जिंकले होते. त्यावेळी आम्ही सुवर्णपदक जिंकण्याच्या खूप जवळ आलो होतो आणि शेवटच्या फेरीत आम्ही ते गमावले होते. ते खूप वेदनादायक होते. यावेळी दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकले याचा मला आनंद आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे ती पुढे म्हणाली.
सर्वोत्तम संघ असल्याचे दाखवून दिले : प्रज्ञानंद
आम्ही पहिल्यांदाच ऑलिम्पियाड जिंकलो आहोत याचा मला खूप आनंद आहे. आम्ही यापूर्वी फक्त एक कांस्य जिंकले होते आणि यावेळी आम्ही दोन्ही विभागांमध्ये जिंकण्यात यशस्वी झालो. त्यामुळे आमच्यासाठी ही एक अतिशय खास भावना आणि अभिमानाचा क्षण आहे, असे प्रज्ञानंद म्हणाला. आम्ही चांगले बुद्धिबळ खेळलो आणि आम्ही सर्वोत्तम संघ असल्याचे दाखवून दिले, असेही तो पुढे म्हणाला.
अनेक वर्षांच्या मेहनतीचा परिणाम : नारायणन
पुऊष संघाचा कर्णधार श्रीनाथ नारायणनसाठी हे सुवर्णपदक अनेक वर्षांच्या मेहनतीचा कळस आहे. मी ऑलिम्पियाड जिंकलेल्या सर्वांत बलाढ्या संघाचा कर्णधार राहिलो हे जाणून चांगले वाटते. पण जेव्हा असे काही तरी नेत्रदीपक घडते तेव्हा तो सहसा अनेक वर्षांच्या प्रयत्नांचा परिणाम असतो आणि येथेही तेच घडले, असे तो म्हणाला. आमच्याकडे ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक आहे. आता आम्हालाही भारतीय विश्वविजेता हवा आहे, म्हणून आम्ही गुकेशचा जयजयकार करू, असे त्याने पुढे सांगितले.