ऑलिम्पियाड : भारताची विजयी आगेकूच चालूच
पुरुष बुद्धिबळ संघाचा आइसलँडवर, तर महिलांचा झेक प्रजासत्ताकवर विजय
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट, हंगेरी
भारतीय पुऊष संघाने गुरूवारी येथे 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या दुस्रया फेरीत आइसलँडवर 3-0 अशी मात करत आपली विजयी मोहीम आणखी पुढे नेली. या विजयाचे नेतृत्व आइसलँडच्या एच. स्टिफन्सनवर विजय मिळवणाऱ्या डी गुकेशने केले.
लागोपाठ विजय मिळविल्याने भारतीय पुरूषांना आइसलँडविरूद्ध चिंता करण्याची फारशी गरज भासली नाही. मात्र आइसलँडने हार मानण्यापूर्वी दमदार कामगिरी केली. त्यात हरिकृष्ण हा एकमेव असा भारतीय खेळाडू राहिला ज्याला विजय मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले. दुसरीकडे, भारतीय महिला खेळाडूंनी झेक प्रजासत्ताकवर 3.5-0.5 अशा फरकाने विजय मिळविला. पहिल्या फेरीतील लढतीत वंतिका अग्रवालच्या वाट्याला बरोबरी आली होती, तर यावेळी तानिया सचदेवला बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र इतर तीन सहकाऱ्यांनी सहज विजय मिळवला.
ग्रँडमास्टर गुकेश हा प्रेक्षणीय खेळाडू म्हणून उदयास आला असून त्याने आपली वाढ या स्पर्धेतही दाखवली. सामन्याच्या मध्यावर पारडे दोन्ही बाजूंनी समान प्रमाणात झुकलेले असताना चेन्नईच्या या खेळाडूने एक धाडसी निर्णय घेतला आणि प्याद्याचा बळी दिला. सुऊवातीला ही चाल चांगली वाटली नाही. पण त्याने नंतर दिग्गज गॅरी कास्पारोव्हची आठवण करून देणाऱ्या शैलीत कोंडी फोडली.
दुसऱ्या फेरीत प्रज्ञानंदने विश्रांती घेतल्याने विदित गुजराथीने कार्यभार स्वीकारला आणि त्याने परिपूर्ण कामगिरी करून दाखविली. अर्जुन एरिगेसीने देखील आपला सामना जिंकताना काही उत्तम युक्ती वापरल्या, तर हरिकृष्णला अंतिम ‘टाइम कंट्रोल’वर पोहोचल्यानंतरही अनुकूल निकाल लागावा यासाठी धडपडावे लागले. महिला विभागात हरिका आणि वंतिका यांनी कनिष्ठ मानांकित झेक महिलांविऊद्ध अपेक्षित विजय मिळवला, परंतु तानिया सचदेवला अर्ध्या गुणावर समाधान मानावे लागले.