ऑली पोपने उडवली भारताची झोप
हैदराबाद कसोटी रंगतदार स्थितीत : दुसऱ्या डावात इंग्लंडचा धमाका
वृत्तसंस्था/ हैदराबाद
येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेला भारत व इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लिश संघाने 6 बाद 316 धावा करत 126 धावांची आघाडी मिळवली आहे. पहिल्या डावात भक्कम आघाडी मिळवल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघ विजयाचे स्वप्न पाहत होता, पण पोपने नाबाद 148 धावांची खेळी साकारत भारताची झोप उडवल्याचे पाहायला मिळाले. दिवसअखेरीस पोप 148 तर रेहान अहमद 16 धावांवर खेळत होते. आता, आता सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडिया पुनरागमन करणार की इंग्लंड आपली आघाडी वाढवणार याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
प्रारंभी, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 7 बाद 421 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 15 धावांत भारताने आपले उर्वरित 3 विकेट गमावल्या. भारताला पहिला धक्का जो रुटने दिला. त्याने डावातील 120 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. रूटने षटकातील तिसऱ्या चेंडूवर जडेजाला बाद केले. त्याने 180 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह 87 धावा केल्या. जडेजा बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह क्लीन बोल्ड झाला. बुमराहला खातेही उघडता आले नाही. यानंतर रेहान अहमदने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव 436 धावांवर संपुष्टात आणला. अक्षरने 100 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 44 धावांचे योगदान दिले. केएल राहुल, जडेजा व अक्षर पटेलच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या डावात 190 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
विशेष म्हणजे, इंग्लंडच्या सर्व 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. जो रुटने 79 धावांत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जो रुटचा कसोटीतील हा दुसरा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल आहे. याशिवाय, टॉम हार्टले आणि रेहानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. जॅक लीचने 1 विकेट घेतली.
पोपचे नाबाद शतक, इंग्लंडचा जोरदार पलटवार
दुसऱ्या डावात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी झाली. बेन डकेट 47 धावा करून बाद झाला तर क्रॉलीने 31 धावांचे योगदान दिले. क्रॉली व डकेट ही जोडी बाद झाल्यानंतर अनुभवी जो रुट व जॉनी बेअरस्टो हे दोघेही फार काळ मैदानावर टिकले नाहीत. रुटला 2 धावांवर बुमराहने तर बेअरस्टोला 10 धावांवर जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार बेन स्टोक्स दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. अश्विनने त्याला बोल्ड करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. 163 धावांत 5 गडी बाद झाल्यानंतर ऑली पोप व बेन फोक्स यांनी सहाव्या गड्यासाठी 112 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
पोपने एका बाजूने किल्ला लढवताना पाचवे कसोटी शतक झळकावले. पोपच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंड संघाने भारतावर आघाडी मिळवण्यात यश मिळवले आहे. संपूर्ण दिवस पोपने खेळून काढताना 208 चेंडूत 17 चौकारासह नाबाद 148 धावा फटकावल्या. त्याला फोक्सने चांगली साथ देत 34 धावा केल्या. अखेरीस अक्षर पटेलने ही जोडी फोडता भारताला सहावे यश मिळवून दिले. अक्षरने फोक्सला बाद केले. यानंतर दिवसअखेरीस पोप व रेहान अहमद यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 77 षटकांत 6 गडी गमावत 316 धावा केल्या होत्या. भारताकडून अश्विन व बुमराहने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल, जडेजाने एकेक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव 246 व दुसरा डाव 77 षटकांत 6 बाद 316 (क्रॉली 31, डकेट 47, पोप खेळत आहे 148, रेहान अहमद खेळत आहे 16, बेन फोक्स 34, अश्विन व जडेजा प्रत्येकी दोन बळी).
भारत 121 षटकांत सर्वबाद 436 (जैस्वाल 80, केएल राहुल 86, जडेजा 87, अक्षर पटेल 44, एस.भारत 41, जो रुट सर्वाधिक चार बळी). चौथ्या दिवसाकडे चाहत्यांच्या नजरा
हैदराबादमधील उभय संघातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अर्थात, चौथ्या दिवशी पाहुणा संघ टीम इंडियासमोर किती धावांचे आव्हान देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तिसऱ्या दिवशी पोपने नाबाद शतकी खेळी साकारत इंग्लंडला 126 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. इंग्लंडचा संघाने उद्या मोठी धावसंख्या उभी केली तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ लवकरात लवकर बाद करण्याकडे टीम इंडियाचा कल असणार आहे.