For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑली पोप टीम इंडियासाठी ठरला ‘कोप’, पदार्पणवीर हार्टलीचाही धमाका

06:57 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑली पोप टीम इंडियासाठी ठरला ‘कोप’  पदार्पणवीर हार्टलीचाही धमाका
Advertisement

हैदराबाद कसोटीत साहेबांनी पलटवली बाजी : भारतावर 28 धावांनी विजय : मालिकेत 1-0 ने आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

फिरकीपटूंना अनुकूल अशा राजीव गांधी स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला. साहेबांनी फिरकीचे बुमरँग टीम इंडियावर उलटवताना पहिल्या कसोटीत 28 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. दरम्यान, ऑली पोप (196 धावा) आणि पदार्पणवीर टॉम हार्टली (68 धावांत 7 बळी) इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आता, उभय संघातील दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे दि. 2 फेब्रुवारीपासून सुरु होईल.

Advertisement

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने 246 धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताने पहिल्या डावात 436 धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, केएल राहुल आणि रवींद्र जाडेजाने आक्रमक फलंदाजी केली होती. कसोटीतील पहिला आणि दुसरा दिवस भारताने आक्रमक खेळ करुन आपल्या नावावर केला होता. मात्र, तिसऱ्या व चौथ्या दिवशी इंग्लंडच्या ओली पोपने बाजी पलटली. त्याने भारताने घेतलेली सर्व आघाडी स्वत:च्या खेळीच्या जोरावर मोडून काढली. जडेजा व अश्विनच्या फिरकीचा यशस्वी सामना करताना पोपने 278 चेंडूत 21 चौकारासह 196 धावा केल्या. त्याचे द्विशतक केवळ 4 धावांनी हुकले. चौथ्या दिवशी इंग्लंडने 6 बाद 316 धावावरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. पोपने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत छोट्या छोट्या भागीदाऱ्या केल्या. यामुळेच इंग्लिश संघाला 420 धावांपर्यंत पोहोचता आले व टीम इंडियाला 231 धावांचे लक्ष्य मिळाले.

टीम इंडियाचा ‘हार्ट’ली ब्रेक

फिरकीला अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी 231 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. पण 12 व्या षटकात जैस्वाल 15 धावा करून बाद झाला. शुभमन गिलची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. गिलला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर हार्टलीने कर्णधार रोहित शर्मा व अक्षर पटेलला बाद करत भारताचे टेन्शन वाढवले. रोहित 39 तर अक्षर 17 धावांवर बाद झाला. केएल राहुलही फारकाळ टिकला नाही. 22 धावांवर रुटने त्याला पायचीत केले. जडेजाची रनआऊट झाला. अय्यरनेही (13 धावा) निराशा केली. यावेळी भारताची अवस्था 7 बाद 119 धावा अशी झाली होती. अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि केएस भरत यांनी आठव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली. मात्र पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टलीने दोघांनाही प्रत्येकी 28 धावांवर बाद करत भारताच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. सिराजला 12 धावांवर बाद करत हार्टलीने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टीम इंडियाचा दुसरा डाव 69.2 षटकांत 202 धावांवर आटोपला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव 546 व दुसरा डाव 420 (ऑली पोप 196, हार्टली 34, बेन फोक्स 34, बुमराह 4 तर अश्विन 3 बळी)

भारत पहिला डाव 436 व दुसरा डाव 69.2 षटकांत सर्वबाद 202 (रोहित शर्मा 39, केएल राहुल 22, एस भरत 28, आर. अश्विन 28, हार्टली 68 धावांत 7 बळी).

एक संघ म्हणून आम्ही अपयशी ठरलो - कर्णधार रोहित शर्मा

पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर रोहित शर्माने आपली नाराजी व्यक्त केली. पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतल्यानंतर आम्ही या सामन्यात आघाडीवर आहोत असे वाटले होते. पण, ऑली पोपने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती खरंच अविस्मरणीय होती, असे रोहित म्हणाला. आम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि योजना चांगल्या प्रकारे राबविल्या. मात्र एकूणच, एक संघ म्हणून आम्ही अपयशी ठरलो. बुमराह आणि सिराजने पाचव्या दिवसापर्यंत फलंदाजी करावी, अशी माझी इच्छा होती. अश्विन व इतर तळाच्या फलंदाजांनी खरोखरच चांगली लढत दिली, असे सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला.

भारताविरुद्धचा विजय अविस्मरणीय - इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स

गतवर्षी बेन स्टोक्स इंग्लंडचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने बॅझबॉल नीती वापरून अनेक मालिका जिंकल्या. पण यामध्ये रविवारी भारताविरुद्ध मिळवलेला विजय सर्वोत्तम होता, असे स्टोक्स म्हणाला. मी कर्णधार  झाल्यापासून आम्ही अनेक विलक्षण क्षण अनुभवले. पण टीम इंडियाविरुद्धचा हा विजय अविस्मरणीय असा आहे. या विजयाचे श्रेय ऑली पोप, टॉम हार्टली व इतर संघसहकाऱ्यांचे आहे, असेही तो म्हणाला.

Advertisement
Tags :

.