वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मारोळीतील वृद्ध महिला जखमी
मारोळी प्रतिनिधी
मारोळी ता.मंगळवेढा येथे शेतात राहणाऱ्या रवी कुटुंबातील वयोवृद्ध महिला सिध्दव्वा मलकांण्णा रवी (वय 60 ) शेतात काम करत असताना तरस वन्यप्राण्यांने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत.मंगळवेढा येथे प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की,सदरची घटना काल सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान मारोळी शिवारात घडली. मंगळवेढा आणि जत (जि.सांगली) च्या सीमेवर असलेल्या मारोळी या गावाच्या परिसरामध्ये फॉरेस्ट भाग असल्याने वन्य प्राण्यांचा वावर सातत्याने असून हे वन्यप्राणी जनावरे, शेळ्या,गाई, सह माणसावर हल्ला करत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे शिवाय लहान मुले व वयोवृद्ध महिला यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी तरसाचा उपद्रव वाढल्यामुळे या परिसरातील नागरिकांनीच तरसाचा आटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर वन विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले. तरसा चा उपद्रव्य कमी करण्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले मात्र आज चक्क सिद्धव्वा रवी या महिलेच्या घरात कोणी नसल्याने त्या शेतात काम करीत असताना अचानक तरसाने हल्ला करून त्यांच्या मांडीचा चावा घेतला. जातीचा दाखला काढण्यासाठी जतला गेलेला मुलगा घरी आल्यानंतर तिला उपचारासाठी मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे.
यापूर्वीही लांडग्याच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेळ्यांवरती हल्ला केल्यामुळे शेतकरी चिंतेत होता त्यावेळी मारोळी येथील मल्हारी करे यांनी लेखी तक्रार वन विभागाकडे नोंदवली होती. या वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी या संदर्भात वारंवार मागणी करून ही ठोस पावले उचलले जात नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वन्य प्राण्याकडून होत असलेल्या हल्ल्याचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने वन विभागाकडून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकातून होत आहे.