ओल्ड ग्रॅन्ट प्रॉपर्टी खरेदी-विक्री करता येणार
कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत माहिती : कामचुकार शिक्षकांवर होणार कारवाई
बेळगाव : कॅन्टोन्मेंटमधील ओल्ड ग्रॅन्ट प्रॉपर्टी यापूर्वी खरेदी-विक्री करता येत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे बेकायदेशीररित्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याचे समोर आले होते. या व्यवहारातील अडचणी दूर करण्यासाठी डिफेन्स मिनिस्ट्रीने नवीन नियमावली केली आहे. ओल्ड ग्रॅन्ट प्रॉपर्टी यापुढे खरेदी-विक्री करता येणार असल्याने बेळगावमधील नागरिकांना दिलासा मिळाल्याची माहिती कॅन्टोन्मेंटच्या मासिक बैठकीत देण्यात आली. बुधवारी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सभागृहात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. नव्या नियमावलीमुळे आता दीड वर्षानंतर घर नावावर करून घेणेही शक्य होणार आहे.
खानापूर रोडवर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. समृद्ध फौंडेशनच्या सहकार्याने नवीन स्वच्छतागृह बांधले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. खासदार फंडातून उभारण्यात आलेल्या आरओ प्लांटचे कामदेखील लवकरच पूर्ण केले जाणार आहे. दरवर्षी राज्य सरकारकडून एसएफसी फंड मंजूर केला जातो. यावर्षी केवळ 15 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन 78 एलईडी बल्ब बसविण्याला मंजुरी देण्यात आली. कोरोना, तसेच गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्यामुळे खबरदारी घेण्याची सूचना कॅन्टोन्मेंटचे चेअरमन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केली. मागील आर्थिक वर्षात कॅन्टोन्मेंट बोर्डला कराच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीसंदर्भात माहिती देण्यात आली.
खड्डे बुजविण्यासाठी 37 लाखांच्या निविदा
कॅन्टोन्मेंट बोर्डकडे नवीन रस्त्यांच्या कामासाठी निधी नसल्याने आहे त्या रस्त्यांची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी तीनवेळा निविदा काढूनदेखील डागडुजीसाठी कंत्राटदार मिळाला नसल्याची माहिती सीईओंनी दिली. परंतु कॅन्टोन्मेंटमधील रस्ते पूर्णत: खराब झाले असल्याची तक्रार सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी मांडली. यावर खड्डे बुजविण्यासाठी 37 लाखांच्या निविदा लवकरच काढल्या जातील, असे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी आमदार असिफ सेठ, सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर, सीईओ राजीवकुमार उपस्थित होते.
मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई
कॅन्टोन्मेंट बोर्डकडून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करूनदेखील यावर्षीचा दहावीचा निकाल समाधानकारक लागला नसल्याने अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूल मुख्याध्यापकांवर दोन दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत प्रगती दिसून न आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर पुढील काळात कामचुकार शिक्षकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.