खेळ जुनाच ओळख नवी ! लंगडी
10:26 AM Feb 07, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
लंगडी...भारतातील प्राचीन खेळांपैकी एक...एकेकाळी हा खेळ शालेय स्तरावर अक्षरश: प्रत्येक भागात खेळला जायचा आणि ग्रामीण परिसरांमध्ये तर तो खूप लोकप्रिय होता...लंगडीला भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं...2009 मध्ये भारतीय लंगडी महासंघाची स्थापना झाल्यानंतर हा खेळ संपूर्ण भारतात ‘लंगडी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर समान नियम बनविले गेले. शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या प्रयत्नांना देखील चालना मिळाली...
Advertisement
- लंगडी हा दोन संघांमधील एक सांघिक खेळ...यात एका संघातील एक खेळाडू एक पाय वर काढून दुसऱ्या पायावर धावत म्हणजे ‘लंगडी’ खेळत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करत असतो...
- प्रत्येक संघात 12 खेळाडू आणि तीन अतिरिक्त खेळाडू खेळतात. सामना एकंदरित 36 मिनिटांचा असतो आणि प्रत्येकी नऊ मिनिटांच्या चार सत्रांमध्ये खेळविला जातो...प्रत्येक संघाला लंगडी खेळत प्रतिस्पर्ध्याचा पाठलाग करणं आणि प्रतिस्पर्ध्यापासून स्वत:चा बचाव करणं या दोन्ही भूमिका बजवाव्या लागतात...
- प्रत्येक सामन्यात दोन डाव असतात. एका डावानंतर 2 मिनिटांचा विराम असतो आणि प्रत्येक सत्रानंतर 2 मिनिटांचा ब्रेक...
- सामन्यापूर्वी नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकणारा संघ ‘डिफेंडर’ होतो म्हणजेच लंगडी खेळत माग काढणाऱ्यापासून स्वत:चा बचाव करतो व प्रतिस्पर्धी संघ मग एका पायावर धावत विरोधी खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एकेक खेळाडू उतरवितो. पाठलाग करणारा खेळाडू जोपर्यंत एका पायावर राहतो तोपर्यंत तो मैदानाबाहेरही जाऊ शकतो...
- जर बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेला किंवा त्यानं ‘लाइन फॉल्ट’ केला तर त्याला बाद घोषित केलं जातं...एकदा मैदानात असलेल्या सर्व बचावपटूंना स्पर्श करून बाद केलं की, बचावपटूंचा एक नवीन संच नियुक्त केलेल्या प्रवेश क्षेत्रातून मैदानात प्रवेश करतो...
- जर पाठलाग करणाऱ्या खेळाडूला एका पायावर राहता आलं नाही अन् त्याचा तोल जाऊन दुसरा पाय जमिनीला टेकला, तर त्याला मैदान सोडावं लागतं आणि त्याच्या जागी दुसरा सहकारी येतो. पाठलाग करताना ज्या पायानं लंगडी सुरू केली होती तो पाय बदलण्याची परवानगी दिली जात नाही. जर त्यानं तसं केलं, तर त्याला बाहेर जावं लागतं....दोन्ही संघांना पहिल्या डावाच्या आपल्या पहिल्या सत्रात उजव्या पायानं आणि दुसऱ्या डावाच्या दुसऱ्या सत्रात डाव्या पायानं लंगडी खेळत पाठलाग करावा लागतो...
- सत्राच्या सुऊवातीला 3 खेळाडू बचावासाठी मैदानात येतात. या 3 बचावपटूंना बाद केल्यानंतर लगेचच पुढील 3 बचावपटू मैदानात प्रवेश करतात. जर तुकडीतील एका खेळाडूला किंवा 3 खेळाडूंच्या पूर्ण तुकडीला प्रतिस्पर्धी खेळाडूनं ‘एल लाईन’ (जीएच) ओलांडण्यापूर्वी ‘फील्ड-2’मध्ये प्रवेश करता आला नाही, तर संबंधित बचावपटू किंवा पूर्ण तुकडी उशिरा प्रवेश केल्याबद्दल बाद होऊ शकते...
- बचावपटूला बाद केल्यानंतरच पाठलाग करणाऱ्या संघाला एक गुण मिळू शकतो. जो संघ सर्वाधिक बचावपटूंना बाद करतो त्याला विजेता घोषित केलं जातं...
Advertisement
Advertisement
Next Article